बंधाऱ्यासाठी दहा कोटी देण्याच्या निलेश राणे यांच्या आश्वासनाचे पुढे काय झाले ?

तपस्वी मयेकर व सन्मेष परब यांचा विजय केनवडेकर यांना सवाल

⚡मालवण ता.०६-: मालवण शहरातील दांडी येथील बंधाऱ्याचे श्रेय घेण्यापूर्वी भाजपच्या विजय केनवडेकर यांनी निलेश राणे यांच्या तळाशील तोंडवळी येथील बंधाऱ्यासाठी दहा दिवसात १० कोटीचा निधी देण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे भूमिपूजन केलेल्या देवबाग बंधाऱ्याचे काय झाले ? याची माहिती विजय केनवडेकर यांनी घ्यावी आणि प्रसिद्ध करावी, असे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तपस्वी मयेकर व सन्मेष परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

दांडी येथील बंधाऱ्याबाबत विजय केनवडेकर किंवा त्यांचे नेते नारायण राणे यांचे कोणतेही श्रेय नाही. दांडी येथील बंधारे आणि रांज नाल्याचे काम हे आमदार वैभव नाईक साहेब यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले आहे. त्या बंधाऱ्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी करून जे काही कागदपत्रे लागतील ती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कार्यालयात देण्यात आली. त्याचप्रमाणे आमच्या मच्छिमार बांधवांच्या होड्या कशा पद्धतीने किनाऱ्यावर काढता येणार, त्या प्रमाणे बंधाऱ्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विजय केनवडेकर व त्यांच्या कंपूने करू नये, असेही तपस्वी मयेकर व सन्मेष परब यांनी म्हटले आहे.

ज्याप्रमाणे विजय केनवडेकर यांनी सांगितल्या प्रमाणे बंधाऱ्याच्या कामावर ते स्वतः लक्ष ठेवणार आहेत, त्याबद्दल शंका नाही. परंतु महिन्यापूर्वी जे बोगस रस्ते मालवणात झाले त्यावर लक्ष का नाही ठेवलात ? लक्ष ठेवला असता तर आज नक्कीच चांगले रस्ते जनतेला पहायला मिळाले असते. त्याचप्रमाणे महिन्याभरात खड्डे पडले नसते, असा टोलाही तपस्वी मयेकर व सन्मेष परब यांनी लगावत जर राजकीय सुडापायी संबंधित कामास विरोध केल्यास मच्छिमार बांधव योग्य ते उत्तर देतील, असा इशाराही मयेकर, परब यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page