इन्सुली- वेत्ये -निगुडे- सोनूर्ली येथे सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीमुळे ग्रामस्थांना त्रास…

गौण खनिज उत्खनन व क्रशर त्वरित बंद करा: अन्यथा आंदोलन: ग्रामस्थांनी दिला प्रांत अधिकाऱ्यांना इशारा..

⚡बांदा ता.०५-: इन्सुली- वेत्ये -निगुडे- सोनूर्ली येथे सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीमुळे इन्सुली कोठावळेबांध ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. येथील गौण खनिज उत्खनन व क्रशर त्वरित बंद करावेत तसेच सन 2018, 2019 मध्ये झालेल्या पंचनाम्याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आम्ही 26 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय सावंतवाडी येथे उपोषण करणार असा इशारा इन्सुली ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार सावंतवाडी व उपविभागीय अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले की, आमच्या गावच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाच्या खाणी आहेत. या खाणीमध्ये उच्च क्षमतेचे बोअरब्लास्टिंग केले जाते तसेच सदरचे ब्लास्टिंग वेळी अवेळी केले जात असून ब्लास्टिंग झाल्यावर येणाऱ्या उग्र वासाचा आम्हा ग्रामस्थांना तसेच लहान मुलांना व वयोवृद्ध यांना मोठा त्रास होतो. चोवीस तास क्रशर व ड्रीलिंग चालू असल्याने क्रशर मुळे उडणारी धूळ आमच्या कलम बागेवर पडून त्याचे मोठे नुकसान होते. या सुरुंग स्फोटामुळे पाण्याचे अंतर्गत स्रोत नष्ट होत असल्यामुळे गावात पाणी टंचाई भासत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करून कोणतीही दखल घेतली जात नाही.
त्यामुळे आम्हाला होणारा त्रास लक्षात घेऊन आपण सदरचे उत्खनन व क्रशर त्वरित बंद करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर 26 जानेवारी रोजी उपोषण करणार आहोत असे लेखी निवेदन ग्रामस्थ अजय कोठावळे, सुबोध परब, शरद कोठावळे, नंदकिशोर कोठावळे यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page