शिक्षण विभागाकडे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित

शिक्षणाधिकारी यांनी अधिकृत वेळ देण्याची शिक्षक प्रतिनिधीची मागणी..

⚡कणकवली ता.०२-: तालुम जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत. शासनाकडून आर्थिक लाभाबाबत वारंवार विलंबाने होणारे शासन निर्णय यामुळे प्रलंबित प्रश्नांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच शिक्षण विभागाकडून त्यांच्या विभागाकडे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न वेळीच सुटत नसल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक लाभापासून वंचित रहात आहेत. त्यासाठी या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करुन प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी शिक्षक प्रतिनिधीकडून शिक्षणाधिकारी यांच्याकडे अधिकृत वेळ मागण्यात आली आहे. अशी माहिती सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पदाधिकारी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, रमेश आर्डेकर, प्रभाकर ढवळ व सोनू नाईक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

 शासनाच्या २० टक्केच्या चुकीच्या धोरणामुळे निवडश्रेणी हा  एक गंभीर प्रश्न बनला आहे. या जिल्हा परिषदेकडून दि. ३१/१२/१९६७ पर्यंत सेवेत रुजू झालेल्या व १९९३ पर्यंत निवडश्रेणीसाठी पात्र असलेल्या  निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यानंतरच्या शिक्षकांना व नंतरकार्यरत शिक्षकांना असा हा  लाभ  सेवाज्येष्ठता  क्रमाने मिळत जाणार आहे. परंतु १९९४ पासूनच्या पात्र शिक्षकांना लाभच मंजूर केलेला नाही. तसेच त्यांची  सेवाज्येष्ठता क्रमानुसार पात्रता यादीही तयार केली नसल्यामुळे हा लाभ मिळणे दुर्लभ झाले आहे. त्यासाठी दि. ०१/०१/१९६८ पासून सेवेत रुजू  झालेल्या  शिक्षकांची पात्रता यादी तयार करण्यासाठी २०१८ पासून वारंवार मागणी करण्यात येत आहे. परंतु ती यादीच  तयार होत नसल्यामुळे लाभ देण्यापर्यंतची कार्यवाही होऊच शकत नाही.  १९९४ ला पात्र असलेल्या शिक्षकांना यापुढे लाभ मंजूर झाल्यास २०२४ साल सुरु झाले आहे.  त्यामुळे ३० वर्षानंतर लाभ मंजूरीचा आदेश होणे म्हणजे निवडश्रेणी हा मरणोत्तर पुरस्कार आहे काय अशी शंका शिक्षकांना येऊ लागली आहे. या विषयाचा ही जिल्हा परिषद गांभीर्याने विचार करणार की नाही हा प्रश्न आहे.
याशिवाय दीर्घ सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या बदल्यात अनुज्ञेय अर्जित रजेचे रोखीकरण करणे, ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना १ जुलै रोजीच्या काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देणे, सेवानिवृत्त  शिक्षकांचे  दरमहाचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या १ तारीखला मिळण्यासाठी  शासनाची  निवृत्ती  वेतन प्रणाली / आज्ञावली  लागू करणे, नियमित पेन्शन अदालती घेणे, सेवानिवृत्त  पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची  निवडश्रेणी  पात्रता यादी अद्ययावत करणे, सुमारे ६० शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा शेाध घेणे, आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढी  देणे व सेवानिवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी उपदान व गटविम्याच्या रकमा त्वरीत मिळण्याबाबतची कार्यवाही होणे या  विषयांच्या चर्चेसाठी अधिकृत वेळ  मागणारे निवेदन सादर करण्यात आले आहे अशी  माहिती  सुरेश पेडणेकर,  चंद्रकांत  अणावकर,  सुधाकर देवस्थळी, बाबू परब, रमेश आर्डेकर, प्रभाकर ढवळ व सोनू नाईक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
You cannot copy content of this page