सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे आयोजन.
ओरोस ता १
बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कामगार आयुक्त संदेश आयरे, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
हा मेळावा सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कल्याणकारी संघ यांच्यावतीने संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गवंडी, मेस्त्री, सुतार, वेल्डर, सेंट्रिंग, प्लास्टर, फरशी फिटिंग, पेंटर, मिक्सर चालविणारे, प्लंबर, स्लायडिंग, वायरमन, पॉलिश मशीन चालविणारे, दगड कापणारे, खाण कामगार, विट भट्टी, चुना भट्टी, लोहार, मदतनीस आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघ अध्यक्ष बावल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर यांनी केले आहे.
यावेळी पालघर जिल्हा भागिरथ प्रतिष्ठान अध्यक्ष दिनेश भोईर, ग्रामसेवक संघटना माजी जिल्हाध्यक्ष संतोष गावडे, कौशल्य भारत प्रशिक्षण अधिकारी उत्तम मुंबरकर, उद्योजक बाबल पावसकर, कामगार कल्याणकारी मंडळ अधिकारी सुश्मिता नाईक, कुडाळ माजी सभापती श्रेया परब, स्वाभिमानी कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे, श्री देव रवळनाथ ट्रस्ट अध्यक्ष तानाजी परब, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ चव्हाण, उद्योजक महेश पालव आदी उपस्थित राहून शासनाच्या लाभ देणाऱ्या विविध योजना व शासन स्तरावर येणाऱ्या अडचणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
