⚡मालवण ता,३१-: मालवण कुंभारमाठचे सुपुत्र उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी मागील तीन वर्षातील हापूस आंब्याचे घेतलेले प्रथम उत्पादन तसेच त्यावर केलेल्या संशोधना बद्दल अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हॉलिवूड यु. एस. ए यांनी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलेली कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट दिनांक २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, कुलसचिव कृषी उच्च आयुक्त आणि अंबासी इकॉनॉमिक चान्सलर यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि डॉक्टरेटचे मानपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या बरोबरच वेंगुर्ला आडेली येथील अनंत दिगंबर आजगावकर यांनी लाल भेंडी मध्ये संशोधन करून ब्राऊन, पिस्ता, वेलवेट रेड या जाती निर्माण केल्याने त्यांनाही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी याच युनिव्हर्सिटी कडून महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील पहिली डॉक्टरेट आदर्श सरपंच डॉ. पोपटराव पवार यांना प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तम फोंडेकर आणि अनंत आजगावकर या दोघांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी तसेच अनेकांनी अभिनंदन केले आहे. डॉ. फोंडेकर आणि डॉ. आजगावकर यांची वेंगुर्ला भटवाडी ते खर्डेकर कॉलेज पर्यंत वेंगुर्ला वासियांनी मिरवणूक काढीत स्वागत केले.
