भाजपकडून शासकीय कार्यक्रमातून राजकीय प्रचार करण्याचे काम…

हरी खोबरेकर:भाजपच्या दडपशाहीला येत्या काळात उत्तर देण्यास आम्ही तयार…

⚡मालवण ता.३०-: भाजपने गेल्या दहा वर्षाच्या सत्तेत किती योजना आणल्या, किती जनतेपर्यंत पोहचल्या आणि किती जणांना लाभ मिळाला हा प्रश्न आहे. योजना जनतेपर्यंत न पोहचल्यामुळेच विकास यात्रा काढाव्या लागत आहेत. या शासकीय कार्यक्रमासाठी शासकीय निधी वापरताना त्यातून बॅनरबाजी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची केली जात आहे. जनतेच्या पैशातून आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. जनतेच्या पैशाची लूट कशी करावी हे भाजप कडून शिकावे. शासकीय कार्यक्रमातून राजकीय प्रचार करण्याचेच काम भाजपकडून देशभरात केले जात आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करत भाजपच्या या दडपशाहीला येत्या काळात उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

मालवण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. त्यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, सन्मेष परब, मंदार ओरसकर, प्रसाद चव्हाण, दत्ता पोईपकर, भारती आडकर, गजा नेवाळकर, राहुल परब, सिद्धेश आचरेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, जनतेच्या पैशाचा चुराडा करून शासकीय कार्यक्रमांमधून आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा वाकवून शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कार्यक्रम राबविले जात आहेत. क्लास वन दर्जाचे अधिकारी असे कार्यक्रम घेत आहेत. दुसरीकडे मात्र जनतेची कामे अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाहीत. योजनांवर पंतप्रधान यांचा फोटो लावला जात आहे. यापूर्वीच्या सरकारला देशाचा आदर होता, शासकीय योजनांवर यापूर्वी कधीही सरकारचे नाव किंवा पंतप्रधान यांचा फोटो लावला गेला नाही. मात्र आता योजनांवर मोदी सरकार किंवा मोदींचा फोटो कां ? लोकशाहीत फक्त कोणा एकट्याचाच वाटा आहे का? असा सवाल हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला.

कुडाळ येथे विकसित भारत संकल्प रथाला शिवसैनिकांनी विरोध केल्यानंतर शिवसैनिकांवर ३५३ सारखे गुन्हे दाखल होण्यासाठी काही बोके पोलीस स्थानकात गेले होते. मात्र गुन्हे अंगावर घेण्याची सवय शिवसैनिकांना आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कोणीही काळी मांजर आडवी आली तरी जशास तसे उत्तर दिले जाईल. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील तीन तिघडा बिघडा असे असंविधानिक सरकार यांनी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केल्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो, येत्या काळात या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आणि जनतेची कामे करण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू, असेही खोबरेकर म्हणाले.

तसेच राम मंदिर व्हावे हे सर्वांचेच स्वन होते. राम मंदिर होण्या मागे शिवसैनिक, कारसेवक आणि हिंदुत्ववादी संघटना यांची मोठी मेहनत आहे. कोर्टाने आदेश दिल्यावरच राम मंदिर उभारणीस सुरुवात झाली. त्यामुळे राम मंदिर बाबत भाजपने फुकाचे श्रेय घेऊ नये, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

म्हणून मालवणात संघर्षात्मक भूमिका घेतली नाही – वाळके

यावेळी नितीन वाळके म्हणाले, विकसित भारत संकल्प रथाला काल कुडाळ येथे जनतेचा विरोध दिसून आल्यावर आज मालवणात या रथाला विरोध व्हावा, असा जनतेचा आग्रह होता. मात्र वर्षाचा अखेरचा दिवस आणि मालवणात मोठ्या संख्येने असलेले पर्यटक यामुळे मालवणात कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संघर्षाची किंवा आंदोलनाची भूमिका घेऊ नये असे आम्ही ठरविले. ही भूमिका आमच्या सर्व पदाधिकारी तसेच जनतेलाही पटली, असे नितीन वाळके यांनी स्पष्ट केले. तसेच अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराचे काम अपूर्ण असतानाही राजकीय हेतू व आगामी लोकसभा निवडणूक समोर ठेवून मतांच्या राजकारणासाठी २२ जानेवारी रोजी मंदिर उदघाटनचा घाट घातला गेला आहे. राम मूर्ती प्रतिष्ठापणा व राम मंदिराचे उदघाटन हे राम नवमीला करणे जास्त उचित ठरले असते. तसेच खासदारांचे निलंबन करून भाजपकडून लोकशाहीला व संविधानाला संपविण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र याला चोख उत्तर देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असेही नितीन वाळके म्हणाले.

You cannot copy content of this page