निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ; रविवारी दोन्ही डाॅक्टर गायब ; कारवाई करा विकास गावडे यांची मागणी..
⚡सावंतवाडी ता.२४-: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक असलेले दोन्ही डॉक्टर रविवारी ड्युटीवर हजर नसल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना माघारी परतावे लागले विशेष म्हणजे राठोड नामक एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला ओपीडीची जबाबदारी दिल्याचाही धक्कादायक प्रकार तेथे पुढे आला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची परवा नसलेल्या अशा संबंधित डॉक्टरवर प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडू असा इशारा निरवड्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गावडे यांनी दिला.
येथील प्रगतशील शेतकरी उत्तम परब यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी आज सकाळी नऊ वाजता विकास गावडे यांच्यासह भूषण पेडणेकर शंकर सावंत सुशांत गावडे हे निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु त्या ठिकाणी गेल्यावर आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेले डॉक्टर विक्रम मस्के आणि सौ लंबे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता दोघेही बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान त्या ठिकाणी राठोड म्हणून असलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने पण तपासणी करतो असे सांगून उत्तम परब यांना औषधे लिहून दिली मात्र संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी चौकशी केली असता आपण मित्र म्हणून या ठिकाणी आलो आहे असे सांगितले. एखादा आरोग्य कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून देतो हे धक्कादायक असल्याने विकास गावडे यांच्यासह सोबत असलेल्यांनी आरोग्य यंत्रणेला फोनाफोनी सुरू केली. एवढ्यात त्या ठिकाणी डिसिल्व्हा नामक महिला डॉक्टर आल्या त्याने उत्तम परब त्यांची तपासणी केली. यावेळी त्याने मला फोन आल्याने आपण या ठिकाणी तपासणीसाठी आले असे सांगितले. एकूणच हा सगळा प्रकार लक्षात घेता चुकीचा असल्याने निष्काळजी आरोग्य यंत्रणेमुळे एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो अशी नाराजी गावडे यांनी व्यक्त केली. रविवार असला तरी संबंधित डॉक्टरांनी येथे हजर असणे गरजेचे आहे आज नऊ ते बारा या वेळेत तब्बल दहा ते बारा पेशंट परतुन गेले याला जबाबदार कोण त्यामुळे संबंधितावर चौकशांती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन याबाबत आवाज उठवणार आहे प्रसंगी आंदोलनही छेडू असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान याबाबत डाॅ. विक्रम मस्के यांना विचारले असता ते म्हणाले समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडे जबाबदारी देऊन आपण बाहेर गेलो होतो. समुदाय आरोग्य अधिकारी रुग्ण तपासणी करु शकतात. रविवारी कामानिमित्त बाहेर पडू शकतो, एखाद्यावेळी अतिदक्ष रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आमची असते. असे स्पष्ठ केले.
