एलईडी मासेमारी बंद करा, अन्यथा कार्यालयात साफ सोडणार

कारवाईला घाबरत नाही भाजपनेते नीलेश राणेंचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी-: सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असून बंदी असतानाही एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखण्याबरोबरच एलईडीची मासेमारी बंद न केल्यास कार्यालयात साप सोडण्यास मागे पुढे पाहणार नाही. आमच्यावर खुशाल कारवाई करावी असा खणखणीत इशारा भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, बाबा मोंडकर, आनंद शिरवलकर, प्रीतेश राऊळ, महेश मांजरेकर, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर, अभय कदम आबा हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, एलईडी मासेमारी बंद व्हावी यासाठी २०१८ मध्ये तीव्र आंदोलन उभे केले होते. २०१४ साली जे मच्छीमारांचे प्रश्न होते ते आजही आहेत पारंपरिक मच्छीमारांची जी मागणी आहे तीच आजही असून हा प्रश्‍न सुटलेला नाही. स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली आहे. पारंपरिक मच्छीमारांनी जे साखळी उपोषण छेडले आहे आज त्यांची भेट घेतली. पारंपरिक मच्छीमार परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स तसेच एलईडीच्या मासेमारीमुळे मेटाकुटीस आले असून ते आत्मदहन करण्याच्या भूमिकेत आहे. याचे शासनाला कोणतेही सोयरसुतक नाही. पालकमंत्री पर्ससीनच्या ट्रॉलर्सवर कारवाई करू शकत नाही कारण त्यांना एलईडी पर्ससीनधारकांचे हफ्ते सुरू आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार जी भूमिका घेतील त्यांच्यासोबत आपण उभे राहणार. त्यांची बाजू घेणार. पारंपरिक मच्छीमारांचा लढा हा आमचा लढा आहे. अधिकार्‍यांना ज्या भाषेत समजावयाचे आहे त्या भाषेत समजावू. ते पुढे म्हणाले, कायद्याची अंमलबजावणी ही स्थानिक पातळीवर करायची आहे. मात्र अधिकारी करीत नाही. जर मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांकडून अंमलबजावणी झाली नाही तर पुराव्यासह पोलिसांच्या समोर या अधिकार्‍यांना धडा शिकविणार याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. आतापर्यत सामंजस्याने खूप घेतले. मात्र आता खूप झाले. एलईडीच्या मासेमारीमुळेच हे वाद होत आहेत. त्यामुळे ही मासेमारी बंद व्हायलाच हवी असेही राणे म्हणाले

You cannot copy content of this page