शासन पारंपरिक, पर्ससिन भावंडांत भांडण लावतेय

पर्ससिन मश्चिमार अशोक सारंग यांची टिका

मालवण दि प्रतिनिधी आम्ही काळाप्रमाणे बदलत शासन नियमांप्रमाणे पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारी करून प्रगती करत आहोत. आज समुद्रात मासळी कमी होण्याबाबत अनेक कारणे असताना केवळ पर्ससीन व एलईडी मासेमारीलाच पारंपारिक मच्छीमारांकडून लक्ष्य केले जात आहे. एलईडी मासेमारी घातक नाही तसेच आम्हाला अनधिकृत म्हटले जाऊ नये. मुळात शासनानेच पारंपारिक व पर्ससीन मासेमारी याची परिभाषा ठरवलेली नसून पारंपारिक मच्छीमारांनाही कायद्याची अपुरी माहिती आहे. सरकार पारंपारिक व पर्ससीन या दोन मच्छीमार भावांमध्ये वैर निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे, आणि आमच्या प्रगतीचा पोटशूळ आल्यामुळे पारंपारिक मच्छीमार आंदोलने करत आहेत, अशी टीका पर्ससीन व एलईडी लाईट मच्छीमारांच्यावतीने अशोक सारंग यांनी केली. मालवण राजकोट येथील हॉटेल हाय टाईड येथे पर्ससीन व एलईडी लाईट नौका धारक मच्छीमारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी अशोक सारंग हे बोलत होते. यावेळी जॉन नरोना, सहदेव बापर्डेकर, रुजारीओ पिंटो, रेहान शेख, अमित गावकर, मुजफ्फर मुजावर, पास्कॉल पिंटो, इलियास होलसेकर, श्रीपाद पाटकर, हनिफ मेमन, कोयंडे, गोपीनाथ तांडेल, आबा बापर्डेकर, मेमन, रिहान मुजावर, प्रवीण कांदळगावकर, पारकर आदी उपस्थित होते. यावेळी अशोक सारंग म्हणाले, आज पारंपरिक मच्छीमार आमच्या विरोधात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र मासेमारी कायद्याचा अभ्यास करून त्यांनी आंदोलन करावे. आम्ही आजपर्यंत बचावात्मक भूमिका घेतली मात्र आता आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे. पर्ससीन व एलईडी यात गल्लत केली जात आहे. आम्हाला अनधिकृत मच्छीमार म्हटले जाऊ नये. शासनाने दिलेल्या मुभा व नियमांनुसारच आम्ही मच्छीमारी करतो. आमच्या नौका नोंदणीकृत आहेत. १२ नॉटिकल सागरी मैल ही राज्य शासनाची हद्द आहे. तर त्यापुढे असणाऱ्या केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या २००कि.मी. सागरी हद्दीत कोणतीही नौका कोणत्याही प्रकारची मासेमारी करू शकते. त्यास प्रतिबंध करता येत नाही, आम्ही १२ नॉटिकल बाहेर मासेमारी करत असल्याने आमची पर्ससीन व एलईडी मासेमारी अधिकृतच आहे असा दावा यावेळी अशोक सारंग यांनी केला. मात्र पारंपारिक मच्छीमार कायद्याचा अभ्यास न करता आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या दबावाखाली मत्स्य विभाग आमच्यावर कारवाई करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. असे सारंग म्हणाले एलईडी लाईट मच्छीमारी घातक नाही. उलट एलईडी लाईट मच्छीमारी ही मासेमारीची पारंपारिक पद्धतच आहे. पूर्वीपासून खाडी, नदी, तलाव याठिकाणी दिव्याचा प्रकाश टाकून त्याकडे मासे गोळा झाल्यावरच मासे पकडले जायचे. तेच आम्ही खोल समुद्रात करत आहोत. असेही सारंग म्हणाले. एलईडी व पर्ससीन मासेमारीमुळे मत्स्य साठा कमी होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मत्स्य साठा कमी होण्यास इतर अनेक कारणे आहेत त्याकडे सरकार दुर्लक्ष कार्य आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स येथील समुद्रात राज्याच्या हद्दीत अगदी १० वाव सागरी अंतरात येऊन मोठ्या प्रमाणावर मासेमारी करतात. शेतकऱ्यांकडून जमिनीत वापरले जाणारे रासायनिक खत पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात येऊन मिसळत आहे. त्यातून माशांना धोका निर्माण होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम समुद्रातील पाण्याच्या तापमानावर होऊन माशांसाठी ते मारक ठरत आहे. या गोष्टींकडे पारंपारिक मच्छीमार लक्ष न देता केवळ आम्हाला विरोध करून चुकीच्या मागण्या करत आहेत. खरेतर मासेमारी बंदी कालावधीत पारंपारिक मच्छीमारच नियम तोडून मासेमारी करत असतात. त्यावर शासन कोणतीही कारवाई करत नाही असेही सारंग यांनी सांगितले. अधिकृत व अनधिकृत मच्छिमारीबाबतची भूमिका शासनानेच स्पष्ट करावी. त्यासाठी समिती गठीत करून अभ्यास करावा असेही सारंग म्हणाले.

You cannot copy content of this page