महेश कांदळगावकर ; प्रशासकाच्या मनमानी बाबत आंदोलनात्मक पावित्र्याचा इशारा…
⚡मालवण ता.१८-: मालवण येथील नगरपालिकेच्या सभागृहाचे तात्पुरते नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचा समारंभ सिने कलावंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. सिने कलावंत उपस्थित राहणे हे भूषणावह आहे. पण मालवणच्या विकासासाठी गेली कित्येक वर्ष ज्या माजी लोकप्रतिनिधीनी याच सभागृहात बसून काम केले त्यांना या कार्यक्रमाला सोयीस्कर विसरण्यात आले ही संताप जनक बाब आहे अशी टिका मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकातून केली आहे.
दरम्यान प्रशासकाच्या मनमानी कारभारा बाबत आवाज उठवूनही कार्यवाही होत नसल्याने येत्या काळात आंदोलनात्मक पावित्रा घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकात असे म्हटले आहे की, मालवण येथील नगरपालिकेच्या सभागृहाचे तात्पुरते नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचा समारंभ सिने कलावंतांच्या उपस्थितीत करण्यात आला. अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती होती की काम अर्धवट असताना हा कार्यक्रम उरकण्यात आला. आमदार, खासदार यांचे अधिवेशन सुरु आहे ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी होती का? जर उदघाटन करायचेच होते तर विद्यमान खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या तारखा घेणे आवश्यक होते. वास्तवीक पाहता पालिकेमध्ये विकासाचे सर्व निर्णय याच सभागृहातून घेतले जातात आणि या सभागृहात येण्यासाठी अनेकांची राजकीय मनीषा असते. असे हे सभागृह आकर्षक आणि सर्व सोयी सुविधा युक्त असावे यासाठी आमच्या कालावधीमध्ये नगरपालिकेचे आर्किटेक निकम यांच्याकडून या सभागृहाचे सुमारे ५० लाख रुपयाचे अंदाजपत्रक करून घेतले होते. पण याच कालावधीत कोरोनाच संकट आले आणि यावेळी शासनाने वैद्यकीय कामासाठी निधींना प्राधान्य दिल्याने विकासकामासाठी कमी निधी दिला गेला. त्यामुळे त्यावेळी हा प्रस्ताव पाठवला गेला नव्हता. दरम्यान आमचा कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला. जर सभागृह नूतनीकरण करायचे होते तर या कालावधीत हा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत कोणतीही कार्यवाही का केली नाही. आमच्या कालावधीत सभागृह नादुरुस्त असताना भविष्यात एक चांगल सभागृह होणार या भावनेतून सर्वच लोकप्रतिनिधींनी याच सभागृहात बसून कामकाज केले होते. आमचा कालावधी संपून आता दोन वर्षाचा कालावधी झाला तरी निवडणुका झालेल्या नाहीत आणि भविष्यात केव्हा होणार याची अनिश्चितता आहे. त्यामुळे या कालावधीत एक परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे करून निधी मिळविण्याचा प्रयत्न न करता आणि सध्या सभागृहाचा वापर नसताना घाईघाईने मनमानी प्रमाणे सभागृहाला लाखो रुपयाची मलमपट्टी करण्यामागच अर्थकारण काय हे आकलन होणारे नाही.
निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधीमार्फत जर या सभागृहाला निधी उपलब्ध केला गेला तर हा तात्पुरता केलेला लाखो रुपयाचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
शहराच्या साफसफाई साठी सुमारे २७ लाख रुपयाचा जेसिबी खरेदी करण्यात आला आहे. आमच्या कालावधीत सुद्धा हा निधी प्राप्त होता. पण याच्या दुरुस्ती देखभाल, ऑपरेटर पगार, डिझेल याच्यासाठी वर्षाला सुमारे सात ते आठ लाख खर्च होणार असल्याने आणि त्यापेक्षा लाख दीड लाख रुपये भाड्या पोटी खर्च करणे परवडणारे असल्याचे आमच्या लोकप्रतिनिधीचे मत झाल्याने आम्ही जेसिबी खरेदी केला नव्हता. त्यामुळे नवीन खरेदी केलेल्या जेसिबीच्या खर्चाचे नियोजन कसे केले जाणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण शहर सफाईसाठी स्वतः कचरा गाड्या खरेदी न करता भाड्याच्या गाड्या घेऊन काम केले जात आहे तर मग नवीन जेसिबी खरेदी करणे हा विरोधाभास का? तसेच शहराच्या स्वछतेसाठी हा लाखो रुपयाचा जेसिबी घेतला आहे तर मग मागील दीड वर्ष सुमारे २५ लाख खर्च करून घेतलेल्या कचरापासून खत निर्मितीच्या मशीन बंद आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या सुरु करण्यासाठी जेसिबी खरेदी इतकी तत्परता का दाखवली गेली नाही याचेही कारण कळणे आवश्यक आहे असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
दरवर्षी अपंगांना पालिका निधीच्या पाच टक्के अपंग निधी दिला जातो. तो त्यांच्या हक्काचा निधी आहे. इतके वर्ष हा निधी त्यांच्या खात्यात परस्पर जमा केला जात आहे. पण कालच्या सभागृह नूतनीकरण कार्यक्रमात अपंगाना निमंत्रीत करण्यात आले. त्यांना चेक देतानाचे फोटो काढून प्रसिद्ध करण्यात आले. जे ज्यांच्या हक्काचे आहे ती मदत केल्याचे भासवून अपंगाच्या निधीचा असा इव्हेंट करण्यात आला हे अशोभनीय आहे.
मागील दीड वर्ष या प्रशासकाच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभारा विरुद्ध आवाज उठवूनही यावर कोणाचाही अंकुश नाही ही बाब सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहणार असेल भविष्यात याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेणे भाग पडणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
