आपासाहेब गुजर:भारतीय सैन्याची यशोगाथा प्रदर्शनाचे शानदार उदघाटन…
⚡मालवण ता.१६-: आपल्या प्रत्येकामध्ये एक सैनिक, एक कॅप्टन, एक योद्धा दडलेला आहे. आपल्यातील या वृत्तीला कशाप्रकारे वलय देता येईल व त्याला अनुभवाची जोड देऊन देशासाठी आपले आयुष्य कशाप्रकारे सार्थकी लावता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी येथे बोलताना केले
पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेनचरस फाउंडेशनच्या वतीने आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई यांच्या सहकार्याने आज भारतीय सैन्याची यशोगाथा या प्रदर्शनाचे उदघाटन मालवणचे गटविकास अधिकारी श्री. आपासाहेब गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी, निवृत्त कॅप्टन सुनील परांजपे, लष्करी इतिहास तग्य नितीन शास्त्री, संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत, प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यटन महासंघाचे सेक्रेटरी दादा वेंगुर्लेकर, श्री. करंगुटकर, प्रफुल्ल देसाई, आर. डी. बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर श्री. खोत सर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे यांनी आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलासाठी आणि भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपण पाकिस्तानवर विजय मिळविला आणि यावेळी जगाचा इतिहास नाही तर भूगोलही बदलला. कारण या दिवशी एक नवीन देश अस्तित्वात आला त्याच नाव बांगलादेश. या विजयासाठी भारतीय सैन्यदालाने जो लढा दिला आहे त्यांच्यासाठी स्मरण म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातून आपल्याला प्रेरणा मिळेलच परंतु आपण आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो याची कल्पना येईल. हे प्रदर्शन सर्वांनी पहावे तसेच तुमच्या घरातील मंडळी यांनाही या प्रदर्शनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री ढमढेरे यांनी केले शेवटी आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.
