⚡सावंतवाडी ता.१५ : सहदेव राऊळ : मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या श्री देव माऊली मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार १६ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
यानिमित्त पहाटे अभिषेक पूजा, त्यानंतर देव मायापूर्वचारी व देवी माऊलीच्या मूर्तींना वस्त्रालंकारांनी सजविण्यात येणार आहे. दुपारी महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर दर्शन सुरु होणार असून नवस बोलणे-फेडणे तसेच केळी व नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री १० वाजता पुरुष व महिला भाविकांची लोटांगणे व पालखी प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा स्थानिक दशावतार कलाकारांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या जत्रोत्सवाला भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
