निवडणूक साक्षरता ही काळाची गरज…

डॉ. विश्वंभर जाधव:स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात निवडणूक साक्षरता कार्यक्रम संपन्न..

⚡मालवण ता.१५-: निवडणूक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. निवडणूक साक्षरता म्हणजे लोकशाहीबाबत सजग राहून लोकशाहीने दिलेला अधिकार आणि निवडणुकीबाबतची आपली भूमिका पार पाडणे, हे आपले कर्तव्य आहे, असे उद्गार मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वंभर जाधव यांनी येथे बोलताना काढले.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर पदवी विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स. का. पाटील महाविद्यालयात निवडणूक साक्षरता कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकुर उपस्थित होते.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने १०० टक्के साक्षरतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक साक्षरतेचे विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याची माहिती देताना प्राचार्य ठाकुर यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. निवडणूक साक्षरता वाढीस लागावी या हेतूने मुंबई विद्यापीठाने या कार्यक्रमाची आखणी केली आहे. या शृंखलेची सुरुवात मुंबई विद्यापीठात मुंबई विभागातून करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी केले. विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षर व्हावे, असे आवाहन केले होते. मुंबई विद्यापीठातील सर्व महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षरता मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कुलगुरूंनी केले होते. त्याला अनुसरून हा कार्यक्रम झाला.

द्वितीय सत्रात जिल्ह्यातील सुमारे ३२ विस्तारकार्य शिक्षक व ५४ विद्यार्थी व्यवस्थापक यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक महाविद्यालयाने स्वतःचे निवडणूक साक्षरता केंद्र उघडून विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, ज्या विद्यार्थ्यांनी भारतीय नागरिक म्हणून स्वतःची नोंदणी केलेली नाही, त्यांनी नोंदणी करून घ्यावी. प्रत्येक तालुक्यांमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.

प्रा. कुणाल जाधव यांनी मुंबई विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची व विभागाच्या ऑनलाईन पोर्टलची माहिती देत संपूर्ण विभाग पेपरलेस करणार असल्याचे जाहीर केले. तिसऱ्या सत्रात क्षेत्र समन्वयक डॉ. सुरेश पाटील यांनी नियोजित उडान फेस्टिव्हलच्या नियमावली व कार्यक्रमांविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील इतर क्षेत्र समन्वयक डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. एम. ए. ठाकुर, प्रा. उमेश परब, डॉ. सा. डी. भेंकी, प्राचार्य डॉ. यशोधन गवस यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मतदार जागृती आदींबाबत माहिती दिली.

डॉ. कुणाल जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे डॉ. सचिन राऊत, किरण पाटील, संतोष पाटील, अविनाश खानविलकर यांनी केले. सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आभार प्रा. प्रमोद खरात, हंबीरराव चौगले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. कैलास राबते आणि डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व्यवस्थापक प्रणिता गोसावी, हर्षाली कांदळगावकर, भाग्यश्री मुसळे, सानिका वायंगणकर, जुही मंचेकर, चैतन्य ठाकुर, प्रथमेश कविटकर, वैष्णवी गावडे, दिव्या चव्हाण, करिना मांजरेकर, चैताली केळुस्कर आदींनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page