बांदा ग्रामसभेत घेतला खासदार विनायक राऊत यांच्या निषेधाचा ठराव…

पाच वर्षात एकही रुपया निधी न दिल्याचे कारण ; शहरातील विविध विषयांवर सकारात्मक निर्णय

⚡बांदा ता.१४-:बांदा शहर ग्रामपंचायतला गेल्या पाच वर्षात विकासकामांसाठी एक रुपया देखील निधी न दिल्याने खासदार विनायक राऊत यांचा निषेधाचा ठराव बांदा ग्रामसभेत घेण्यात आला. भाजपचे पदाधिकारी गुरुनाथ सावंत यांनी हा ठराव मांडला. शहरात सुरु असलेल्या जलजीवनच्या पाईपलाईन कामावरून शिवसनेचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर विरुद्ध सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच जावेद खतीब यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, श्रेया केसरकर, रिया येडवे, रत्नाकर आगलावे, बाळु सावंत, प्रशांत बांदेकर, तनुजा वराडकर, दिपलक्ष्मी सावंत, साईप्रसाद काणेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शहरातील वीज समस्याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना चांगलेच धारेवर धरले. पंधरा दिवस अगोदर आगाऊ लेखी सूचना दिल्याशिवाय शहरातील कोणत्याही ग्राहकांची वीज पुरवठा खंडित करू नये असा ठराव घेण्यात आला. बांदा शहरासाठी कचरा गाडी उपलब्ध करून दिल्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

You cannot copy content of this page