कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन; ठाकरे सेनेचा इशारा..
⚡आंबोली, ता.१२-: येथील घाटात निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदार करत असून बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे.या हलगर्जीपणा विरोधात कामात सुधारणा न केल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
आंबोली रस्त्याच्या खड्डे भरण्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली धूळफेक सुरू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे खड्डे भरण्याचे काम सुरू असून लगेचच ते खड्डे पुन्हा उखडून जात आहेत.ठेकेदारांचा हलगर्जीपणा आणि बांधकाम विभागाने घेतलेले झोपेचे सोंग दिसून येत आहे.त्यामुळे घाटातील रस्ता म्हणजे ठेकेदाराला बांधकामविभागाने आंदण दिला आहे त्यामुळे अत्यंत दुर्दशा झाली आहे. त्यामुळे इथल्या व्यवस्थेला वाली कोण नाही.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असून आणि इथले स्थानिक आमदार हे कॅबिनेट शिक्षण मंत्री असुन जर ही अवस्था असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोलतात ते नेमके काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर बोगस ठेकेदारांना आंदण दिलेला विभाग आणि झोपलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात हे मंत्री अपयशी ठरले आहेत.आतापर्यंत ठेकेदारांनी या भागात मस्तीखोर पणा करून लोकांना आर्थिक शारीरिक त्रास देण्याचे काम करून लाखो रुपयांचा मलिदा धूळफेक करून हडपला आहे.त्यात बांधकाम विभाग जिवंत असल्याचे कोठे दिसून येत नसल्याचे उदाहरण दिसत आहे.ठेकेदारांच्या स्वाधिन रस्ते करून अधिकारी फक्त टेंडर देण्याचे एवढेच काम बघतात काय असा सवाल लोक विचारत आहेत.त्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बोगस ठेकेदारांची लांगुनचांगुण न करता हलगर्जी पणा न करता चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे अन्यथा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.अधिकाऱ्यांना शुद्धीवर येण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने विभाग अध्यक्ष बबन गावडे,संतोष उर्फ बुधाजी पाताडे,अनिल चव्हाण,काशीराम राऊत,दादा नाटलेकर,बाळा कोरगावकर,उत्तम पारधी,शशीकांत सावंत,सत्यवान गावडे,रूपाजी गावडे आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
