तीन युवकांसह एक युवती जखमी
सावंतवाडी दि: सावंतवाडी रेल्वे स्थानका समोरील रस्त्यावर दोन दुचाकीत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांसह एक युवती जखमी झाली. स्थानिकांनी यातील एकाला उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर तीन युवकांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिरिष खांबल, सचिन पाटकर व अमित नाईक अशी जखमींची नावे असून तिघांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अंकिता गावडे (रा. माजगाव) हिला निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील दोन युवक वेत्ये येथील असल्याची तर दोघे माजगांव येथील असल्याची माहिती उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिली असून त्यांनी जखमी युवकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले.
