⚡कणकवली ता.०९-:
तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर इंगळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी या संग्रहामागची संकल्पना जाणून घेतली आणि या संग्रहातील अनेक संदेश पत्रांचे कौतुक करताना विविध मान्यवरांच्या आठवणी जागवल्या.
तळेरे येथील निकेत पावसकर गेली 16 वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह करीत आहेत. त्यांच्या या संग्रहात देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1700 पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश आहे. या संग्रहाचे प्रदर्शने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी झालेली आहेत.
प्रा. डॉ. सुधीर इंगळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या आगळ्यावेगळ्या अक्षरघराला भेट दिली. यावेळी त्यांनी या संग्रहातील अनेक पत्रे पहिली आणि त्यातील अनेक मान्यवरांच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी डॉ. इंगळे यांनी पावसकर यांना परभणी जिल्ह्यात या संग्रहाचे प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.