मोहन केळुसकर: भाजपासह सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा..
⚡कणकवली ता.०७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेना दिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या आरमाराचे तोंडभरून कौतुक केले. पण १९८२ च्या दरम्यान प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पच्शिम किनारी सागरी महामार्गाचे काम गेल्या ४० वर्षांत पुर्णत्वास गेलेले नाही. कोकणाला ७२० कि. मी. सागरी किनारा लाभला आहे. पंतप्रधानाच्या या दौर्याचे औचित्य साधून लोकप्रतिनिधींनी या महामार्गासह बोट,अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कोविआने १९७८ च्या स्थापनेपासून कोकण रेल्वे, पच्शिम किनारी सागरी महामार्ग, बोट आणि अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालविले आहेत, असे स्पष्ट करुन केळुसकर म्हणाले, रोहिणी बोट १९७५ च्या दरम्यान मालवण किनारी अपघातग्रस्त झाली. मात्र त्यानंतर ही कोकण बोट वाहतूक अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकली नाही. भारतीय बंदर विकास महामंडळाची ही बोट वाहतुक सुरू करण्यास तयार आहे. मात्र समुद्र किनारी गाळ साचल्याने कोकणातील बंदरे सुरक्षित राहिलेली नाहीत, हे प्रमुख कारण सांगितले जाते. मात्र आता आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने ही बुजलेली बंदरे गाळ काढून सुरक्षित होऊ शकतात. त्यामुळे बोट, अंतर्गत जलवाहतूक सुरू करणे शक्य आहे. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधीचा विकास कामी एकोपा नसल्याने ही कामे रखडली आहेत. आता पंतप्रधानच्या कोकणातील या दौर्यामुळे भाजपासह सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा.