खास. विनायक राऊत यांचा आरोप:पंतप्रधानांकडे करणार तक्रार..
⚡मालवण ता.२०-: मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यात ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होत असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवण शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये पैशाची उधळपट्टी होऊन भ्रष्टाचार होत आहे. ही कामे नित्कृष्ट दर्जाची होत असून वाटप झालेला निधी आपल्या घरचा निधी असल्याप्रमाणे निधीची लूटमार करण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत. हे सर्व निषेधार्ह असून याला शासनकर्त्यांचे पाठबळ आहे, असे आरोप खासदार विनायक राऊत यांनी करत हा भ्रष्टाचार पचवू दिला जाणार नाही, याबाबतची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करून या कामांच्या सखोल चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत, असे मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मालवण येथील मालवण हेरिटेज हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खास. विनायक राऊत हे बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, निनाक्षी शिंदे, भाई कासवकर, सन्मेष परब, मंदार ओरसकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, भगवान लुडबे, हेमंत मोंडकर, संतोष अमरे, करण खडपे, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात काही योजना व प्रकल्प राबविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १८ ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असून ती सुस्थितीत करावी, किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांची मूर्ती सुवर्णमंडीत करावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या देशातील पहिल्या आरामाराचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शासकीय जागेत स्मारक व्हावे, जेणेकरून प्रथम आरमार प्रमुखांचा व पर्यायाने कोकणच्या भूमिपुत्राचा गौरव होईल, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली, असे खा. राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे किल्ले सिंधुदुर्गचे भूमीपूजन ज्या ठिकाणी झाले तो ऐतिहासिक मोरया धोंडा, रेकोबा घाटी येथील ढोपर कोपर या ऐतिहासिक स्थानांचे पर्यटन स्मारकात रूपांतर व्हावे जेणेकरून दैदिप्यमान इतिहास पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याचे ते म्हणाले.
आपल्या मागणीची दखल घेत शिवपुतळा उभारणी
आपल्या मागणीपत्रात भारतीय आरमाराचे जनक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग किल्ल्या समोरील पद्मगड किंवा धोंतारा या खडकावर पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून शिवरायांचे स्मारक निर्माण होऊन याठिकाणी बाराही महिने पर्यटकांना शिवरायांचे दर्शन घेता येईल, अशी मागणीही केली होती. या मागणीची दखल घेतली जाऊन राजकोट येथे शिवपुतळा होत आहे. धोंतारा व पद्मगड येथे पुतळा न होता राजकोट येथे जरी होत असला तरी त्याचा आनंद आहे, या पुतळ्याचे मुख सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने असावे अशी मागणी होत असून याबाबतही आपण पंतप्रधान व नौदल यांचे लक्ष वेधले आहे, असेही खास. राऊत म्हणाले.
विकासकामांमध्ये भ्रष्टाचार
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवण शहरात विविध विकासकामे सुरु असून रस्त्याच्या कामात डांबरीकरणाच्या नावाखाली थुकपट्टी लावण्याचे काम सुरु असून पैशाची उधळपट्टी केली जात आहे. तर ग्रामीण रुग्णालयाच्या रंगरंगोटीच्या कामातही चुना लावण्याचे काम ठेकेदारांकडून होत आहे. या कामांच्या चौकशीची मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असून पंतप्रधान याची दखल घेऊन राज्य शासनास त्याबाबतचे आदेश देतील अशी आपल्याला अपेक्षा आहे, असे खास. राऊत यावेळी म्हणाले.
नारायण राणे यांच्या हट्टामुळेच चिपी विमानतळ खासगी ऑपरेटरकडे
चिपी विमानतळाबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हट्टामुळे चिपी विमानतळ हे खाजगी ऑपरेटरकडे देण्यात आले. रस्त्यावर टोलवसुली करणाऱ्या ठेकेदाराला विमानसेवा चालविण्याचा ठेका दिला गेला. विमानसेवा चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना चिपी विमानतळाचे कामकाज त्याच्याकडे देण्यात आल्यामुळे विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. हवाई उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य सिदिंया, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई व आपण संबधित ऑपरेटरबाबत कठोर भूमिका घेतली होती. तसेच तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर व आपल्या निधीतून विमानतळाची विकासकामेही पूर्ण करण्यात आली होती. वैमानिकाला विमान लॅडीग करताना लँडीग पॉईट दिसण्यासाठीची व्हीझीबीलीटी दर्जेदार असणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे चार विमानांचे लॅडिंग कॅन्सल करावे लागले आहे. बिनडोक ऑपरेटरमुळे चिपी विमानतळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. विमानतळ एमआयडीसी किंवा हवाई उड्डाण मंत्रालयाकडे दिल्यास चिपी विमानतळाची परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे मोपाचे विमानतळ सुरू झाले तरीही चिपी विमानतळाचे महत्व कमी होणार नाही, असेही खास. राऊत म्हणाले.
शासन अनधिकृत मासेमारीच्या पाठीशी
पारंपारिक मच्छिमार व पर्ससीन मच्छिमार यांच्यात सुरु असलेला संघर्षाबाबत बोलताना खास. राऊत म्हणाले, किनारपट्टीवरील पारंपारिक मच्छीमार प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगून मासेमारी करत आहेत. परंतु राज्यातील सरकार यांत्रिकी मासेमारी, एलईडी, पर्ससीन मासेमारीचे आधारस्तंभ असून त्यांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांची एक प्रकारे अवहेलना होत आहे. अनधिकृतरित्या एलईडी, पर्ससीन करणाऱ्या बोटी पकडून किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच फौदाजरी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. नौसेना दिनाच्या कालावधीत किनारपट्टीवरी मासेमारी काही दिवसांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडूच्या धर्तीवर नोंदणीकृती बोटमालकांना रोख स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आपण केंद्रीय मत्स्य विभागाकडे केली आहे, असेही खास. राऊत म्हणाले.
