कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत संबधित ठेकदाराला बिल अदा करू नये: ठाकरे सेनेची मुख्याधिकारी मागणी..
⚡मालवण ता.२०-: मालवण शहरात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यात याव्यात. तसेच शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या विकासकामांची चौकशी करण्यात यावी. जोपर्यत या कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत संबधित ठेकदाराला बिल अदा करण्यात येवू नये, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना देण्यात आले.
मालवण शहरातील विविध समस्यांबाबत आज शिवसेना ठाकरे गटाने नगरपालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन चर्चा करत निवेदन सादर केले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, बाबी जोगी, शिला गिरकर, दिपा शिंदे, रश्मी परूळेकर, भाई कासवकर, सन्मेष परब, मंदार ओरसकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर, करण खडपे, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर आदि उपस्थित होते.
मालवण शहरात स्वच्छता व आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील मैला सक्शन गाडी गेले महिनाभर बंद आहे. पर्यटन हंगामात सक्शन गाडी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजा बसविण्याबाबत तीन महिने पाठपुरावा करूनही ते बसविण्यात आले नाहीत. शहरातील ठेकेदाराने कचऱ्याचे काम सुरू केले तरी शहरात कचऱ्याची समस्या जैसे थे आहे. शहरातील कित्येक रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडी तोडण्यात आलेली नाही. शहरातील मच्छरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यावरही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मालवण शहरातील परूळेकर गल्लीचे काँक्रेटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मेढा येथील दोन पिंपळ गटार व वायरी रस्त्याचे सुरू असलेले कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नगरपालिकेच्या भाजी मंडईच्या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मामा वरेरकर सभागृहाकडील नाट्यगृहाकडील हॉलचे काम अपूर्ण अवस्थेत आहे, असेही निवेदनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
या समस्यांचा आठ दिवसात आढावा घेऊन शहरातील विकासकामे व आरोग्याच्या प्रश्नाबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले.
