वेंगुर्ले तालुक्यातील चार मंडळातील बाधित शेतकरी पीक विमा रक्कमेपासून वंचित…

शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर छेडले आंदोलन..

वेंगुर्ले:
तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, शिरोडा या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आज २० नोव्हेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर मातोंड महसूल मंडळातील सर्व काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी तालुका कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने सन २०२२-२०२३ मधील पीक विमा नुकसान भरपाई दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत जमा न झाल्यास तालुका कृषि विभागाला २४ नोव्हेंबर रोजी टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तालुका कृषी विभाग व तहसीलदार यांना देण्यात आले.
सन २०२३-३३ मधील पीक विमा नुकसान भरपाई मातोंड महसुल मंडळाला मिळालेली नाही. महसुल मंडळामध्ये तुळस, पाल, होडावडे, शिरोडा, मातोंड अशी गावे असून चार महिने झाले तरी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत ती देणे बंधनकारक असून सुदधा शेतक-यांवर अन्याय होत आहे. महत्वाची बाब म्हणजे पुर्नरचित हवामान आधारित आंबा बहार सन २३- २४ चा पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असल्यामुळे बरेच शेतकरी विमा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे रखडलेले आहेत. त्यामुळे यावर गांभिर्याने शासनाने लक्ष देऊन दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत विमा नुकसान भरपाई जमा करावी. अन्यथा शेतक-यांना एकजूटीने संघटित होऊन तालुका कृषि विभागाला गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
दरम्यान सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी ३ वाजता स्थगित करण्यात आले. यावेळी आंबा बागायतदार शेतकरी यांची तहसीलदार ओंकार ओतारी, तालुका मंडळ कृषी अधिकारी हर्षा गुंड, विमा कंपनी प्रतिनिधी येडवे, नयन सावंत, वेंगुर्ला शहर तलाठी राहुल गवते यांनी भेट घेतली. दरम्यान तालुका कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी दिलेली उत्तरे ही समाधानकारक नसल्याने आंदोलनकर्ते शेतकरी यांनी तालुका कृषी विभागाला २४ नोव्हेंबर रोजी टाळे ठोकण्याचा भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी या आंदोलनात शेतकरी संघटक श्यामसुंदर राय, माजी पंचायत समिती सभापती यशवंत उर्फ बाळू परब, पेंडुर सरपंच संतोष गावडे, माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे, दिपक गावडे, मधुकर गावडे, मुकुंद नाईक, मातोंड ग्रा.पं. सदस्य दिपेश परब, प्रसाद मराठे, रामचंद्र सावंत ,गोविंद गोळम, बुधाजी कोंडये ,सुभाष भगत, यशवंत भगत ,नारायण गावडे ,प्रल्हाद राणे ,सोमा परब, अभिषेक परब ,प्रदीप सावंत, रविकिरण परब, सुभाष परब , हर्षल परब ,सुधाकर सावंत , संजीव परब ,विनोद चव्हाण, जगदीश परब ,उत्तम नाईक, जनार्दन गावडे ,किशोर परब, स्वप्निल परब, प्रमोद शिरोडकर यांच्यासाहित तुळस महसूल मंडळातील आंबा काजू बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांवर तीव्र संताप

तालुक्यातील शेतकरी आंदोलन करत असताना व शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असताना तालुका कृषी अधिकारी अजून दिवाळीच्या सुट्टीवर असल्याने उपस्थित आंदोलनकर्ते आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे सोयर सुतक नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

फोटो: मातोंड महसूल मंडळातील आंबा काजू पीक विमा रक्कम बाबत कृषी मंडळ अधिकारी यांच्याशी चर्चा करताना आंबा काजू बागायतदार शेतकरी.

You cannot copy content of this page