पुणे येथे वेदशास्त्रोक्तजकच्या परीक्षेत मिळविले यश
सर्वत्र होत आहे कौतुक..
⚡बांदा ता.१३-: बांदा – पानवळ येथील केशव दिवाकर डेगवेकर यांनी सर्वात कठीण अशी स्मार्त ऋग्वेद याज्ञिक चुडामणी ही पदवी त्यांनी वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त केली. त्यांच्या यशाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. आतापर्यंत ही पदवी भारतातील केवळ सहा व्यक्तीच प्राप्त करू शकले आहेत.
त्यांनी शांकर पाठशाळा कवळे-गोवा येथून वैदिक शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षापासून पंधरा वर्ष या शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केला. सध्या ते त्याच पाठशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी अभिज्ञ, कोविद या वैद्यिकशास्त्रातल्या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यासाठी रात्रंदिवस संस्कृत मधील अनेक अवघड विषयांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. गुरुवर्य अरुण वझे पुणे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
४८ खेड्यांचे पुरोहित (कै.) तात्या डेगवेकर यांचा ते पाचवे वंशज आहे. तसेच पुरोहित दिवाकर डेगवेकर यांचा मुलगा आहे. (कै.) भालचंद्र डेगवेकर आणि विद्यमान पुरोहित गजानन डेगवेकर यांचे ते नातू आहेत. त्यांची आत्या सौ. दीपिका बापट यांचा त्याला पुण्यातील पुढील शिक्षणासाठी पाठिंबा मिळाला. आपले आजी-आजोबा, आई-वडील , गोव्यातील मामा तसेच पुरोहित श्री श्रीपाद जोशी , आणि अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व पाठिंबा मिळाल्यामुळे त्यातून हे घवघवीत यश संपादन केल्याचे मत चुडामणी केशव डेगवेकर यांनी व्यक्त केले. तसेच या ज्ञानाचा उपयोग समाजातील इतर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी केला जाईल असे ते म्हणाले.
यापूर्वी ही पदवी प्राप्त केलेले भारतात केवळ सहा व्यक्ती आहेत. या यशाबद्दल रजनी गंगाधर जोशी पुरस्कार, कै. परशुराम परांजपे पुरस्कार, तसेच व्यंकटेश बालाजी पुरस्कार ,वेदमूर्ती केशव दिवाकर डेगवेकर यांना प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी वैदिक क्षेत्रातील अनेक महंत, मान्यवर उपस्थित होते.
