सात वर्षे झाली तरी शिक्षकांना पगार नाही…

वेतन पथकाच्या भोंगळ कारभाराबाबत थेट आयुक्तांचे वेधले लक्ष..

⚡मालवण ता.१०-:
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम केलेल्या तीन शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सन २०१५ – १६ मधील वेतन आज सात वर्षे उलटून गेली तरी अद्याप न दिले गेल्याने शिक्षण विभागाच्या वेतन पथकाच्या या भोंगळ कारभाराबाबत
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी थेट शिक्षण आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे धाव घेत लक्ष वेधले आहे. या वेतनाबाबत प्रशालेने तीन वेळा प्रस्ताव सादर केले असूनही अद्यापही संबंधित शिक्षकांना पगार मिळाला नसल्याने याप्रकरणी लक्ष घालून संबंधित शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विजय पाटकर यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.

मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये सन २०१५-१६ मध्ये तासिका तत्वावर तीन शिक्षक नेमण्यात आले होते. या शिक्षकांचे वेतन मिळण्याबाबत प्रशालेने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र या प्रस्तावांबाबत वेतन पथकाकडून वेळोवेळी विलंब होऊन तसेच वारंवार प्रस्तावातील चुका दाखविण्याचा प्रकार करण्यात आला. वेतन मिळण्याबाबत प्रशालेने सात वर्षात तीन वेळा प्रस्ताव वेतन पथकाला सादर केला. त्यानंतर आता एप्रिल २०२३ मध्ये वेतन पथकाकडून हा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे पाठविण्यात आला मात्र त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी शिक्षण उपसंचालकानी त्रुटी काढून तो प्रस्ताव मागे पाठविला वस्तुतः शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रस्ताव पाहण्यासाठी सहा महिने लावल्याने व त्या प्रस्तावातील त्रुटी काढल्याने हा सारा प्रकार वेळकाढूपणाचा असल्याने श्री पाटकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

एकूणच याबाबत शिक्षण आयुक्तांनी लक्ष घालून वेतन थकीत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विजय पाटकर यांनी या निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page