नौदल दिनाच्या अनुषंगाने पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये…

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे आवाहन

⚡मालवण ता.०९-:
मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यात साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त मालवण शहर व परिसरात कडेकोट सुरक्षा असण्याची शक्यता असून या दरम्यान मालवण शहर व किनारपट्टी भागात लोकांना काही दिवस बंदी घालण्यात येणार आहे, अशी अफवा पसरविण्यात येत आहे, मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पोलीस स्थानकात झालेल्या बैठकीत केले.

मालवण पोलीस स्थानकात मालवण शहरातील नरकासुर धिंड परवानगी बाबत आयोजित बैठकीत शहरातील तरुण मंडळी उपस्थित असल्याने मालवणात होणाऱ्या नौदल दिनाच्या अनुषंगाने पसरत असलेल्या अफवांविषयी जनजागृती व्हावी, कोणतीही अफवा पसरू नये या हेतूने पोलिसांकडून या तरुण मंडळींना काही सूचना करण्यात आल्या.

मालवणात ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ला व राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा दौरा मालवण शहरातून नसून देऊळवाडा सागरी महामार्ग येथून बोर्डिंग मैदान असा मार्ग ठरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही दिवस शहरात व किनारपट्टीवर नागरिकांना बंदी घालण्यात येणार आहे अशा अफ़वा पसरल्या आहेत. मात्र अशी कोणतीही बंदी नाही, असे पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच २ डिसेंबर पर्यंत मालवणात पर्यटक येऊ शकतात, त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना मालवण शहरात येण्यास अडवू नये. डिसेंबरच्या ३ व ४ तारीख रोजी मालवण शहरात येणाऱ्या लोकांची तपासणी होणार असल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी समजून सांगावी, असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले.

त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारी विद्युत रोषणाई देखील किनाऱ्यावर जाऊन बघता येईल. त्याचप्रमाणे बीचवर काही ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून लोकांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच राजकोट भागातील काही घरे जवळ जवळ असल्याने काही ठिकाणी कंपाउंड नसल्याने तेथे बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत, असे श्री. कोल्हे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असेही यावेळी श्री. कोल्हे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page