अखंड लोक मंचतर्फे कणकवली येथे राजा शिरगुप्ते यांना श्रद्धांजली…

⚡कणकवली ता.०७-: अखंड लोक मंच कणकवली व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कणकवलीच्यावतीने साहित्यिक राजा शिरगुप्पे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

राजा शिरगुप्ते यांचे नुकतेच कोल्हापूर येथे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले . कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे, साहित्यिक-कार्यकर्ते, कामगार चळवळ , समाजकारण ते साहित्यिक असा राजा शिरगुप्पे यांचा प्रवास राहिला असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे ते गाढे अभ्यासक होते. राजाभाऊंचा जन्म १९५९ मधील. निपाणी येथे देवचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा विडी कामगार आंदोलनाशी संबंध आला. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, प्रा. सुभाष जोशी यांच्यासोबत त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

चळवळीच्या निमित्ताने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यांनी महागाव, कोल्हापूर येथे अध्यापन केले. आजरा येथे ‘ज्ञानपीठ’ या सामाजिक संस्थेची स्थापना करून; तसेच गडहिंग्लज येथे ‘दिशा शिक्षण संस्था’ उभारून त्यांनी ग्रामीण विकासाशी नाळ जोडली. सांगलीत भरलेल्या विद्रोही सांस्कृतिक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘शोधयात्रा ईशान्य भारताची’, ‘न पेटलेले दिवे’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. महात्मा बसवेश्वर यांच्यावर त्यांनी संशोधनात्मक पुस्तक लिहिले.

कणकवली येथील स्वामी आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये अखंड लोकमंचचे अध्यक्ष -चित्रकार नामानंद मोडक, त्याचबरोबर विनायक सापळे, कवि राजेश कदम,जेष्ठ साहित्यिक मोहन कुंभार,अच्युत देसाई,कवि किशोर कदम,गोपी पवार,,कवयित्री सरिता पवार,कवयित्री कल्पना मलये, शैलाजा कदम,वंदना राणे, महेश काणेकर,आशिष नाईक, सुजय कदम, अमित भोगटे -आदी उपस्थित होते.
श्रद्धांजली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखंड लोक मंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले . यावेळी कल्पना मलये, गोपी पवार,मोहन कुंभार, सरिता पवार,वंदना राणे महेश काणेकर यांनी राजा शिरगुप्पे यांच्या एकूण कार्यावर मते व्यक्त केली .
सूत्रसंचालन व आभार राजेश कदम यांनी केले.राजा शिरगुप्पे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखंड लोक मंचच्या माध्यमातून भविष्यात कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page