*💫बांदा दि.११-:* दुग्ध व्यवसाय हा परंपरागत व्यवसाय असून याला मरण नाही तर या व्यवसायात मोठा फायदा आहे. शासनाच्या सुविधांचा लाभ घेत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय शास्त्रोशुद्ध पद्धतीने करावा, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर यांनी केले. पाडलोस गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी ‘सिंधु कोकण दुग्ध उत्पादक सहकारी संस्था पाडलोस’च्या दुध संकलन केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी डॉ. सुधाकर ठाकूर बोलत होते. व्यासपीठावर भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, पशुवैद्यकीय अधिकारी तथा गोकुळचे प्रतिनिधी डॉ. निखील रेडकर, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कुबल, उपाध्यक्ष हर्षद परब, सचिव आनंद कुबल, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर रोणापाल सरपंच सुरेश गावडे, दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे, आरोस पोलिस पाटील महेश आरोसकर, पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विजय(भाय) गावडे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, संस्थेचे सदस्य, सभासद तसेच ग्रामस्थ व दुध उत्पादक उपस्थित होते. डॉ. देवधर म्हणाले की, पाडलोस गावात पडिक जमीन मोठ्याप्रमाणात दिसत आहे. अशा जमिनीवर पिकांचे उत्पन्न घेतल्यास गावातील प्रत्येकास रोजगार मिळू शकतो. दुध संस्थेच्या लोकांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे. इतरत्र दुध घालणारे शेतकरी जर संघटीत झाले तर संस्था नावारुपास येऊ शकते. दुध व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडल्यास बँकाही पुन्हा कर्ज देण्यास सहकार्य करतील. मेहनती शेतकऱ्यांच्या पाठीशी भगीरथ प्रतिष्ठान सदैव राहील अशी ग्वाही, डॉ. प्रसाद देवधर यांनी दिली. डॉ. निखील रेडकर, सुरेश गावडे, अक्षरा पाडलोसकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजू शेटकर यांनी पाडलोस गावच्या धवलक्रांतीचा शुभारंभ झाला असून शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी संस्था उपयुक्त ठरेल असे सांगितले. सूत्रसंचालन विष्णू नाईक यांनी तर मान्यवरांना सुपारीचे झाड देऊन अर्जुन कुबल यांनी आभार मानले.
पाडलोसमध्ये सिंधु कोकण दुग्ध संस्थेच्या दुध संकलन केंद्राचे उद्घाटन…
