⚡मालवण ता.०२-: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सुपुत्र अमेय प्रभू यांची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील ताज बंगालमध्ये झालेल्या वार्षिक सभेत त्यांनी पदभार स्वीकारला. आयसीसीचे पश्चिम बंगाल बाहेरील ते पहिले अध्यक्ष बनले आहेत.
या सोहळ्याला उद्योग क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रभू म्हणाले, मी हा रोमांचक नवीन अध्याय मोकळ्या हातांनी स्वीकारत आहे. कारण त्यामुळे नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या समोर आल्या आहेत. आमच्या क्षमतेचा फायदा घेत उद्योग जगतासाठीचा विकसित अजेंडा चालविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला खात्री आहे, की आयसीसी आपले पंख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आणखी पसरवेल आणि येत्या काही वर्षांत खरोखरच जागतिक दर्जाचे चेंबर बनेल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
विविध संस्थांवर कार्यरत असणारे अमेय प्रभू एनएएफए कॅपिटल ऍडव्हायझर्स या मुंबईस्थित मालमत्ता व्यवस्थापन, वित्तीय फर्मचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे त्यांची यंग ग्लोबल लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या मानव साधन विकास संस्थेचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहत आहेत. प्रभू हे यूएपी ऍव्हायजर्स एलएलपीचे भागीदार आहेत. त्यांनी वार्विक विद्यापीठातून अर्थशास्त्र, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात बीएससी आणि आयई बिझनेस स्कूल मॅड्रीडमधून एमएससी पदवी घेतली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
