कापलेले भात गोळा करण्यासाठी धावपळ..
⚡दोडामार्ग ,ता.३१-: पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आणि अचानक पाऊसही सुरू झाला.त्यामुळे कापणी केलेले भातपीक गोळा करून नेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे.
हवामान खात्याने यावर्षीचा पाऊस परल्याची घोषणाही करून टाकली होती.त्यामुळे शेतकरी निर्धास्त होते.शिवाय थंडीही सुरू झालेली.त्यामुळे पाऊस परतला असा शेतकऱ्यांचा होरा होता;मात्र शनिवारी २८ रोजी पासून पावसाळी वातावरण दिसू लागले.त्यामुळे पाऊस पडणार असा शेतकरी अंदाज वर्तवत होते.त्यातच हवामान खात्याने शनिवारीच सोमवार, मंगळवारी पाऊस पडेल असा इशारा यलो अलर्ट मधून दिला.एकीकडे पावसाळी वातावरण आणि दुसरीकडे हवामान खात्याचा यलो अलर्ट त्यामुळे शेतकरी चलबिचल झाले आणि पिकलेले भात कापण्यासाठी आणि कापलेले भात सुकवून गोळा करण्यासाठी किंवा मळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतात भातपीक कापणे आणि गोळा करण्यासाठी शेतकरी कुटुंबे राबताना दिसत आहेत.
