प्रवीण कोल्हे:विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा..
⚡मालवण ता.२९-:
सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात सतर्क असले पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षेबरोबरच सुरक्षादूत म्हणून समाजामध्ये भूमिका पार पाडावी, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, असे प्रतिपादन मालवणचे पोलीस पाटील प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय या प्रशालेमध्ये सायबर सुरक्षा सप्ताहनिमित्त मालवण पोलिसांच्यावतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा खोत, एमकेसीएल पुणेचे वैभव उगवेकर आणि नोबेल कॉम्प्युटर मालवणच्या मयुरी बावकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमकेसीएल पुणेचे वैभव उगवेकर यांनी सायबर गुन्ह्यांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. यातूनच गुन्हे वाढीस लागतात, असेही सांगितले.यावेळी सायबर गुन्हे संदर्भात काही क्लिप्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. तर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आदी सोशल मीडिया ऍप्स वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापिका सौ. गोसावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद परुळेकर यांनी केले.
