आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक:ठाकरे शिवसेनेचेच पॅनेल विजयी होणार..
⚡मालवण ता.२७-: आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने उतरलो असून लोकांच्या मनातील उमेदवार असलेल्या मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. आघाडीतील सर्व पक्ष एकत्रिपणे लढत आहेत. शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. टेमकर यांनी आजपर्यंत गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचेच पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
मालवण येथे शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, यतीन खोत, नरेश हुले, युवा संघटनेचे सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, महेश जावकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतील सर्वांच्या संगनमताने मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. मंगेश टेमकर यांनी आचरा गावातील विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. आमदार व खासदार यांनीही टेमकर यांनी सुचविलेली विकासकामे कधीही रोखली नाही. म्हणूनच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मंगेश टेमकर यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये कोणाचीही नाराजी नाही, असेही हरी खोबरेकर यावेळी म्हणाले.
यावेळी हरी खोबरेकर पुढे म्हणाले, यावर्षीचा शिवतिर्थावरील ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा हा लखलखत्या भगव्या तेजात पार पडला. निष्ठावंतांचा महासागर यावेळी दिसून आला. मेळाव्याचे भव्य स्वरूप पाहून शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आदेश या मेळाव्यातून दिला असल्याने शिवसैनिक यामुळे आता न्याय प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांतील जे अधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार त्यांना सहकार्य करणे आणि जे अधिकारी मुजोरगिरी करतील आणि जनतेला वेठीस धरतील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील सर्व शिवसैनिक आक्रमकपणे आता लढण्यासाठी सज्ज झाला आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.
सध्या सर्वत्र आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येत आहे. मालवण ग्रामीण रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात अगर गोवा बांबुळी याठिकाणी हलविले जाते. एकही कायम वैद्यकीय अधिकारी याठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत नाही. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून याठिकाणी प्रशस्त असे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले असताना त्याठिकाणी एकही शस्त्रक्रिया अगर महिलांची प्रसुती केली जात नाही. यामुळे सध्या रुग्णालय व्यवस्थेची दुर्दक्षा झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या कालावधीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि औषधांचा पुरवठा केला होता. आतातर औषधेही मिळताना कठिण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. प्राथमिक शाळा धनदांडग्यांच्या ताब्यात देण्यासाठी, खासगीकरण करण्यासाठी शिक्षणमंत्री प्रयत्नशिल आहेत तर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद करण्याचाही घाट घातला जात आहे. यामुळे सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेही सज्ज असल्याचे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
