मंत्री दिपक केसरकर:पालकांनी सुरु केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित..
बांदा ता.२०-:
बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा ही पीएमश्री मध्ये घेण्यात आली असून ५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक इमारत उभी करण्यात येणार आहे. याठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल व स्कुल बस ची सुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार शिक्षण मुलांना देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात याचे भूमिपूजन होणार असून जिल्ह्यातील ही अद्ययावत शाळा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. केवळ दिशाभूल करून पालकांनी सूरू केलेले बेमुदत शाळा बंद आंदोलन हे बेकायदा असून ते तात्काळ मागे घ्यावे अन्यथा मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री केसरकर यांनी यावेळी दिला. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासानानुसार पालकांनी सुरु केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
आज सकाळी शाळेत माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत शाळा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी केंद्रप्रमुख संदीप गवस व मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये यांना धारेवर धरत आंदोलन करण्यासाठी कोणी परवानगी दिली असा सवाल उपस्थित केला. यावेळी अजय महाजन, भाऊ वाळके, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, अक्षय नाटेकर, राकेश विरनोडकर यांच्यासह माजी विद्यार्थी आक्रमक झालेत. त्यांनी शाळा तात्काळ सुरु करण्याची मागणी केली. यावेळी बेकायदा आंदोलनाला अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप भाऊ वाळके यांनी केला. शाळेच्या आवारात आंदोलन करायचे असेल तर आम्ही व्यापारी आवारात दुकाने सुरु करतो असा इशारा दिला.
सायंकाळी उशिरा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळेत येत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, तहसीलदार श्रीकांत पाटील, केंद्रप्रमुख संदीप गवस आदी उपस्थित होते.
येत्या सोमवारपासून वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्यात येणार आहे. सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. शाळेत अतिरिक्त शिक्षक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यवस्थापन समितीला शाळा बंद करण्याचा अधिकार नाही. त्यांनी केवळ प्रशासनाच्या सहकार्याने शाळेचे व्यवस्थापन पाहायचे आहे. मी याठिकाणी केवळ मुलांसाठी आलो असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिद्ध्ये, हेमंत दाभोलकर, गुरु कल्याणकर, हेमंत मोर्ये, अमोल सिद्ध्ये, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत पांगम, भाऊ वाळके, ओंकार नाडकर्णी, राजेश गोवेकर आदिसह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
