शाळा बंद आंदोलनावर बांदा शाळा व्यवस्थापन व पालक ठाम…

लेखी आश्वासनंतरही कार्यवाही नाही; उद्यापासून आंदोलनाला सुरवात

बांदा ता.१७-:जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ च्या ताब्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनावर पालक ठाम असून उद्या (बुधवारी) सकाळपासून आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. याची सर्वस्वी जबाबदारी हि प्राथमिक शिक्षण विभागाची राहील, जोपर्यंत इमारत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी सांगितले की, सदरची इमारत ताब्यात देण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी जागा कमी पडत आहे. यासाठी लागतची सेंट्रल प्रायमरी स्कुलची इमारत शाळेच्या ताब्यात मिळावी असा ठराव घेण्यात आला होता. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरची इमारत तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. मात्र याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर पालकांनी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण विभागाने आंदोलन न छेडण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र प्रशासनाने केवळ वेळखाऊ कारभार आणि फक्त विविध कार्यालयामध्ये कागदी घोडे नाचवीण्या व्यतिरिक्त कोणतेच काम केले नसल्याचा आरोप करत याचा त्रास बांदा केंद्रशाळेच्या २८३ मुलांच्या भवितव्याला आणि पालकांच्या मनस्थितीला वेठीस धरण्याचा प्रकार आहे.
पालकांची शाळा बंद आंदोलन मागे घेण्याची कोणतीही मानसिकता नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला प्रशासनाने न्याय देऊन त्याची तात्काळ ठोस अंमलबजावणी करावी तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला.
यावेळी अध्यक्ष रत्नाकर आगलावे, हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, उपाध्यक्ष संपदा सिद्ध्ये, श्रद्धा नार्वेकर, हेमंत दाभोलकर आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :-
बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बांदा केंद्रशाळेचे पदाधिकारी व पालक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page