इन्सुलीत बेकायदा दारुसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साइजची कारवाई

⚡बांदा ता.१३-: गोव्यातून महाराष्ट्रात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात इन्सुली एक्साइजने काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ५ लाख १० हजारांची दारु, ७ लाखांचा टेम्पो व २ हजार रुपये किमतीचे प्लायवूड लाकूड असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअप टेम्पोचा चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. टेम्पो मधील कागदपत्रांवरुन बांबा वालाभाई हनुभाई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती इन्सुली एक्साइजला मिळाली होती. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरु होते. काल रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालक तसाच वेगाने टेम्पो घेऊन पसार झाला. एक्साइजच्या कर्मचार्‍यांनी पाठलाग केला असता खामदेव नाक्यावर सदर टेम्पो दिसून आला.मात्र, चालक फरार झाला. टेम्पोची तपासणी केली असता प्लायवूडच्या खाली गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला.
सुमारे ५ लाख १० हजारांची दारु, ७ लाखांचा टेम्पो व २ हजारांचे प्लायवूड लाकूड असा एकूण १२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोबिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.

You cannot copy content of this page