पुन्हा पैसे घेतल्यास मोजायला हात शिल्लक राहणार नाही;आम.नितेश राणे यांचा सरकारी डॉक्टरांना इशारा
*💫कणकवली दि.२४-:* कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही रुग्णांकडून अथवा नागरिकांकडून पैसे घेण्याची हिम्मंत डॉक्टरांची होता नये.पैसे घेण्याचा पुन्हा प्रकार घडला तर पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण तसेच डॉ.सहदेव पाटील यांना दिला. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयातील समस्यांबाबत बैठकीच्या दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सतीश टाक यांनी एका व्यक्तीकडून दाखल्यासाठी २०० रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो मुद्दा आजच्या बैठकीदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी मांडताच आमदार नितेश राणे यांनी हा इशारा दिला. तसेच या प्रकरणी संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशा सूचना ही श्री. राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सहदेव पाटील यांनी संबंधित डॉक्टरांना नोटीस देण्यात येईल असे सांगितले. एनआरएचएम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र यापूर्वी जिल्हा रुग्णालयात ही सुविधा नसल्याने एनआरएचएम अंतर्गत खर्च करण्यात येत होता. आता जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सिटीस्कॅन करून घेता येणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी दिली. कणकवलीहून ओरोस येथे जाण्यासाठी होणारा खर्च व त्रास वाचवण्याच्या दृष्टीने ही उपाय योजना उपजिल्हा रुग्णालय येथे सुरु करा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. कोविड च्या नावाखाली जिल्हा नियोजन ला आलेल्या निधीतील २३ कोटीचा निधी तुम्ही ही खर्च कुठे केला ?उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा पाढा असताना येथे रक्कम खर्च झाली नाही. मग ते २३ कोटी शोकेस मध्ये ठेवले आहेत का? ते रुग्णांच्या सेवेसाठी बाहेर काढा ,अशी आक्रमक भूमिका नितेश राणे यांनी मांडली. सिटीस्कॅनच्या मुद्द्याबाबत आपण पत्र द्या, वरिष्ठांकडे सदर प्रश्न मांडतो ,अशी भूमिका डॉक्टर चव्हाण यांनी घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक मेघा गांगण, शिशिर परुळेकर, बबलू सावंत, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, संतोष पुजारे, नितीन पाडावे, अजय घाडी आदी उपस्थित होते.