बांदा जिल्हा -परिषद शाळा १ बेमुदत शाळा बंद आंदोलन छेडणार…

⚡बांदा ता.१२-: जिल्हा परिषद मालकीची असलेली इमारत भाडेकरार संपल्याने संबंधित संस्थेने परत द्यावी, यासाठी बांदा जिल्हा -परिषद शाळा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात शाळा व्यवस्थापन समिती नमूद केले आहे की, सिंधुदुर्गातील इतर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असताना बांदा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकची पटसंख्या वर्षागणिक वाढत आहे. सद्यस्थितीत मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत आहेत. शाळेकडे आठ संगणक
उपलब्ध असून देखील ते कार्यान्वित करण्यासाठी जागा नाही. जागेअभावी पोषण आहार, धान्यकोठार यांची योग्य सोय करता येत नाही. तसेच शासनाकडून मिळणारी कॉम्प्युटर लॅब व व्हर्चुअल क्लासरुमसारखी सुविधा जागेअभावी मुलांना उपलब्ध करून देता येत नाही.
या बाबींचा विचार केला तर या शाळेला लागून असलेली जि. प. मालकीची एक इमारत एका स्थानिक शैक्षणिक संस्थेला भाडे तत्वावर वापरण्यासाठी देण्यात आली होती. या भाडे कराराची मुदत संपून बरीच वर्षे झाली. त्यामुळे बांदा जिल्हा परिषद शाळेच्या जागेची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित इमारत आपल्या ताब्यात देण्याची मागणी संबंधित संस्थेकडे वारंवार करण्यात आली आहे. जि. प. प्रशासनाचेही याकडे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इमारत परत करण्याचे लेखी आदेश दिले. मात्र, संबंधित संस्था हे आदेश मानत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या कमिटी सदस्यांनी ही बाद आता गांभीर्याने घेतली आहे. नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांची भेट घेत त्यांना १८ ऑक्टोबरपासून शाळा बंद आंदोलन छेडणार असल्याबाबतचे पत्र दिले. यावेळी इमारतीबाबतची योग्य ती कागदपत्रेही सादर केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, पालक समिती उपाध्यक्ष गुरू कल्याणकर, उपाध्यक्षा सौ. संपदा सिद्धये, हेमंत दाभोलकर, हेमंत मोर्ये आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page