4 किलो गांजा जप्त ;वारगाव मधील घटना;वारगाव बनलंय गांजा विक्रीचे केंद्र
*💫कणकवली दि.०९-:* तालुक्यातील वारगाव गावात अवैध गांजा विक्रीवर कणकवली कस्टम विभागाने धाड टाकून 50 हजार रुपये किंमतीचा 4 किलो अवैध गांजा जप्त केला. गांजा विक्रीप्रकरणी अभिषेक प्रवीण गुरव ( रा वारगाव, रोडीवाडी ) याच्या कस्टमच्या पथकाने मुसक्या आवळल्या. 50 हजार रुपये किंमतीचा 4 किलो गांजा अभिषेक कडून जप्त केला.कस्टम निरीक्षक राजेश लाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 8 मार्च रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता ही कारवाई केली. वारगाव गावातील अभिषेक प्रवीण गुरव याच्याकडे अवैध गांजा असल्याची खबर कस्टम विभागाला मिळाली होती. कस्टम अधीक्षक यांच्या सूचनेनुसार निरीक्षक लाडे यांनी वारगाव येथून संशयित अभिषेक याला ताब्यात घेतले. आरोपी अभिषेक याला आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश सलीम जमादार यांनी अभिषेक याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी अभिषेक याची सावंतवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली. सरकारी वकील ऍड. गजानन तोडकरी यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.
