*💫मालवण दि.०९-:* आजच्या युगात पुरुष- महिला असा भेदभाव दिसत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्योद्योग, पोल्ट्री व्यवसाय आदी व इतर व्यवसायांमध्ये महिलांनाही मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महिलांना पाठबळ दिले जाईल. व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मालवण येथे बोलताना केले. मालवण तालुका भाजप महिला आघाडी व भाजपच्या महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.रश्मी लुडबे यांच्या वतीने मालवण भाजप कार्यालय येथे महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, जिल्हा चिटणीस सौ. रेखा काणेकर, मालवण तालुकाध्यक्षा सौ. लक्ष्मी पेडणेकर, सौ. संध्या परुळेकर, नगरसेविका सौ. पूजा करलकर, सौ. अन्वेषा आचरेकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर आदी उपस्थित होत्या. यावेळी घुमडे येथील अनुष्का चौधरी या मुलीने महिलांचा गौरव करणारे काव्य सादर केले. यावेळी रश्मी लुडबे यांनी प्रास्ताविक करत मालवणात विविध क्षेत्रात, व्यवसायात कार्यरत असणाऱ्या महिलांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी मालवणातील स्टॉलधारक महिला, पर्यटन व्यावसायिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, योग शिक्षिका आदी विविध क्षेत्रातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजन तेली म्हणाले, आज कोणत्याच क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. प्रशासनातही महिला राज दिसून येत आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेत महिलांनी निर्भीडपणे पुढे गेले पाहिजे असेही तेली म्हणाले. यावेळी संध्या तेरसे यांनी आज महिलांवर अत्याचाराच्या व घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत असताना त्यातून न्याय कसा मिळवावा याबाबत महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. अन्यायाविरुद्ध प्रत्येक महिलेने आवाज उठविला पाहिजे, असे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी – राजन तेली…
