सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब : मडुरा गावात कोणी किती निधी आणला ते तपासून पहावे..
⚡बांदा ता.०३-: मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपोषणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सदर पुलाकडे लक्ष वेधण्यात आले होते. ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत पूल मंजूर करण्यात आले. कामाला मंजुरी कधी मिळाली याचा अभ्यास अगोदर करावा. त्यामुळे सद्यस्थितीत फुकाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणीच करू नये असा टोला शिवसेना(ठाकरे) सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब यांनी लागला.
दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मडुरा माऊली मंदिर जवळील पुल होण्यासाठी लढा उभारला होता. त्यावेळी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून पुलाचे काम मार्गी लावले. त्यामुळे फुकाचे श्रेय घेणाऱ्यांनी पीडीएफ फाईल बघून बोलावे. कामाला मंजुरी कधी मिळाली, निधी मंजूर कधी केला या सर्व गोष्टींचा विचार करावा. अगोदर मडुरा गावचा विकास करावा, निधी आणावा आणि नंतर बोलावे असे आव्हान उल्हास परब यांनी विरोधकांना दिले.
जुनी कामे घेत नाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये. मडुरा गावचा विकास किती झाला, काय सुख सुविधा आहेत याचा अभ्यास करून बोलावे. मडुरा माऊली मंदिर पुलाचे श्रेय हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच जाते, असा दावा सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब यांनी केला.
दरम्यान पावसाळ्यात पुलावर चिखल झाला होता त्यावेळी आपण अधिकाऱ्यांशी बोलून दगड माती टाकून घेतली. त्यावेळी पत्रक बाजी करणारे कुठे होते, असा सवालही उल्हास परब यांनी केला आहे.
