गांजा पार्टी करताना दोघा तरुणांना घेतले ताब्यात…

कोलगाव येथील घटना:स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कारवाई..

सावंतवाडी ता.०२-: कोलगाव येथील एका बागेत गांजा पार्टी करताना दोघा तरुणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तर अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. ही कारवाई आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोलगाव चर्च परिसरात करण्यात आली. कॅजिटन पिंटो (रा. कोलगाव), सौरभ कदम (रा.ज्युस्तीननगर) अशी त्या दोघांची नावे आहेत. तर पळून गेलेल्या संशयिताचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोलगाव येथील संशयित कॅजिटन हा आपल्या घराच्या मागे असलेल्या बागेत काही युवकांना घेऊन गांजा पार्टी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पिंटो याच्यासोबत त्याचा सहकारी कदम हे दोघे त्या ठिकाणी मिळून आले तर अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कदम, सुधीर सावंत, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर यशवंत आरमारकर, आशिष जामदार यांच्या पथकाकडून करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात पळून गेलेले नेमके कोण, त्यांनी आणलेल्या गांजा नेमका कुठून आणला याचा तपास करण्यात येणार आहे. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page