राजा गावकर:मालवण -कुडाळ विधानसभा मतदार संघावर शिंदे शिवसेनेचा दावा असणार..
⚡मालवण ता.२९-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघ हे दोन्ही मतदार संघ गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदार संघावर आमचाच दावा आहे. या दोन्ही मतदार संघातील उमेदवार शिवसेनेला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. युती मधून जो उमेदवार असेल तो निवडून आणण्यासाठी प्रामाणिक पणे काम करू, मात्र उमेदवार हा शिवसेनेचाच असेल, तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांसाठी शिवसेनेचे किरण सामंत हेच उमेदवार असतील असा दावा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा कित्येक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. आजही या लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचेच खासदार हे धनुष्यबाण या निशाणी वरती निवडून आलेले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती बघता या मतदार संघावरती शिवसेना या पक्षाचाच दावा असणार आहे आणि किरण सामंत हे आमचे नेते असून ते शिवसेना या पक्षामध्येच आहेत. म्हणूनच आम्ही आमच्या प्रत्येक बॅनर वरती त्यांचा फोटो नेते मंडळींच्याच रांगेमध्ये लावतो. ते जर इतर कोणत्या पक्षांमध्ये असते किंवा आमच्या शिवसेनेमध्ये नसते तर आम्ही त्यांचा फोटो नेत्यांच्या रांगेमध्ये लावला नसता. रत्नागिरी लोकसभा मतदार संघा मध्ये किरण सामंत यांना खासदारकीची उमेदवारी मिळणार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे, कार्यकर्त्यांना चांगली उभारी आलेली आहे. त्यामुळे किरण सामंत यांनाच ही उमेदवारी मिळावी ही तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती मिळणार अशी आशा व विश्वास आहे, असे राजा गावकर यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघ हा पण शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. या ठिकाणी देखील विद्यमान आमदार हे शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत ते दुसऱ्या पक्षामध्ये असल्यामुळे मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघावरती देखील शिवसेनेचाच दावा राहील. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचेच होते, आहेत आणि राहतील. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार हा शिवसेनेला मिळावा यासाठी आम्हा सर्व शिवसैनिकांचे प्रयत्न आहेत. तसेच शिवसैनिकांचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या तिघांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक व इतर सर्व नेतेमंडळींच्या सहकार्याने आम्ही दोन्ही मतदार संघाचे उमेदवार निश्चितच निवडून आणू शकतो. तरीही युतीमध्ये या दोन्ही मतदारसंघात जो उमेदवार मिळेल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार. परंतु, शेवटपर्यंत आम्ही आमचा दावा या मतदारसंघावरती ठेवणार आहोत, भले इतर कोणीही उमेदवार आमच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत असेल तरीही आम्ही पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणणार, पण उमेदवार हा शिवसेनेचाच असेल, असेही राजा गावकर यांनी म्हटले आहे.
