*माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनंतर प्रस्ताव मंजूर:पंतप्रधान कार्यालयाकडून आर्थिक सहाय्य मंजुरीचे पत्र प्राप्त..

⚡देवबाग ता.२५-: देवबाग (ता. मालवण) येथील यश देवानंद चिंदरकर यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वैद्यकीय संचालकांना पत्र पाठविले आहे.
यश चिंदरकर यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार असून, या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. यासाठी त्यांच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी आर्थिक मदतीसाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाख रुपयांची मदत उपचाराच्या खर्चाचा काही भाग भागविण्यासाठी तत्त्वतः मंजूर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रात रुग्णाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची जबाबदारी स्वीकारून प्रत्यक्ष झालेल्या उपचार खर्चाचा तपशील निर्धारित नमुन्यात सादर करण्याच्या सूचना हॉस्पिटलला देण्यात आल्या आहेत. तसेच मंजूर रकमेचा वापर उपचारासाठी झालेल्या पात्र खर्चापुरताच करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या मंजुरीपत्राची प्रत यश चिंदरकर यांचे नातेवाईक देवानंद परशुराम चिंदरकर, देवबाग, सिंधुदुर्ग तसेच खासदार नारायण राणे यांनाही पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अंडर सेक्रेटरी (फंड्स) प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या महागड्या उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मिळालेली ही ३ लाख रुपयांची मदत यश चिंदरकर यांच्या कुटुंबाला मोठा आधार ठरणार आहे.
