परशुराम उपरकर: परंतु नौदलाच्या या कार्यक्रमात सत्तारूढ भाजपने राजकारण आणू नये,..
⚡मालवण ता.२७-: ज्या किल्ल्याचे भूमिपूजन आणि वास्तुशांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली अशा एकमेव मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर महिन्यात भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा हे आम्हालाही अपेक्षित आहे, परंतु केंद्र सरकारला किल्ले सिंधुदुर्गवर तो पुतळा उभारणे शक्य होत नसेल तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपुजन केले त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, मात्र नौदलाच्या या कार्यक्रमात सत्तारूढ भाजपने राजकारण आणू नये, तसेच हा कार्यक्रम आम्ही करीत असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून जे दाखविले जात आहे ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया मनसेचे राज्यनेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मनसे नेते परशुराम उपरकर हे आज मालवण दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपरकर म्हणाले, डिसेंबर महिन्यात जो नौदल दिन कार्यक्रम होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. नौदल दिन हा कार्यक्रम नौदलाच असून सत्तारूढ भाजपने हा कार्यक्रम आपला असून आपणच करत असल्याचा जो दिखावा निर्माण केला आहे तो करू नये. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असले तरी नौदलाच्या या कार्यक्रमाला भाजपने पक्षीय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू नये, किंबहुना या कार्यक्रमात राजकारण आणू नये, असा इशारा उपरकर यांनी दिला आहे. हा इशारा देतानाच सध्या चर्चेचा विषय बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या विषयावर भाष्य करताना परशुराम उपरकर म्हणाले, किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे. मात्र केंद्र सरकारला ते शक्य न झाल्यास त्यांनी मोरयाचा धोंडा या ठिकाणी पुतळा उभारावा म्हणजे आपसूकच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी शिवप्रेमी व पर्यटकांचा ओघ वाढेल, असेही श्री. उपरकर म्हणाले.
