मालवण (प्रतिनिधी)
कणकवली मधून मालवणात फिरण्यासाठी आलेला ११ मित्रांचा ग्रुप तारकर्ली येथील एमटीडीसी केंद्रासमोरील समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लूटत असताना या ग्रुपमधील सुफियान दिलदार शेख (वय २४ रा. साकेडी मुस्लिमवाडी, ता. कणकवली) या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली. तर याचवेळी समुद्रात बुडणाऱ्या अन्य दोघांना वाचविण्यात यश आले.
दरम्यान, काल समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या सुफियान दिलदार शेख या तरुणाचा मृतदेह आज वायरी जाधववाडी येथील समुद्रात तरंगताना आढळून आल्यावर मृतदेह समुद्राबाहेर काढून काढण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसेच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारूण शेख, अरबाज इम्तियाझ शेख (रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली) आणि शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी (सर्व रा. मुस्लिम वाडी हुमरठ ता. कणकवली) आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ (सध्या रा. नलावडे चाळ शिवाजी नगर कणकवली) असे एकूण ११ जण काल आचरा येथे फिरण्यासाठी निघाले. आचरा येथे पोहचल्यावर त्यांनी मालवणात जाण्याचा निर्णय घेत दुपारी ते तारकर्ली येथे पर्यटन केंद्रच्या समोरील समुद्रकिनारी पोहचले. सायंकाळी हे मित्र समुद्रात स्नानासाठी उतरले. यावेळी किनाऱ्यावर व्हॉलीबॉल खेळत असताना सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी हे दोघेही पाण्यात बुडू लागल्याने साहिल शेख याने आरडाओरडा केला. त्यामुळे सर्वजण त्या दिशेने धावले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. अरबाज शेख याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी मतीन हा देखील बुडू लागला असता लाटेच्या जोराने तो किनाऱ्यावर आला. मात्र सुफियान हा समुद्राच्या पाण्यात आत ओढला गेल्याने तो समुद्रात बेपत्ता झाला. रात्री उशीरापर्यंत तो सापडून आला नव्हता.
समुद्रात बुडताना वाचविलेल्या अरबाज व मतीन या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र अधिक उपचारासाठी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले.
वायरी समुद्रात सापडला मृतदेह
काल तारकर्ली येथील समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या सुफियान शेख याचा मृतदेह आज सकाळी वायरी जाधववाडी येथील समुद्रात किनाऱ्यापासून काही अंतरावर पाण्यात तरंगताना ग्रामस्थ श्रीकृष्ण जाधव यांना दिसून आला. यानंतर सामाजिक कार्यकर्ते मंगेश पराडकर उर्फ ढोले बाबू यांनी हा मृतदेह पाण्यातून किनाऱ्यावर आणला. याबाबत मालवण पोलीसांना माहिती दिल्यावर सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव व पोलीस हवालदार सुभाष शिवगण यांनी त्याठिकाणी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी सुफियान याचे नातेवाईकही हजर झाले होते.
सुफियान याच्या मृतदेहाचे मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
