पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत; राजाराम सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी नोंदणी अत्यल्प प्रमाणात झाली आहे. तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता तसेच ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नुकसानभरपाई व विविध कृषी योजनांच्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याने ई-पिक नोंदणीसाठी जिल्ह्यात युद्धपातळीवर विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित हंगामातील पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. मात्र, ई-पिक पाहणी नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. भविष्यात नुकसानभरपाई, दुष्काळी मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ देताना या नोंदीचा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
ई-पिक नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून शंभर टक्के नोंदणी पूर्ण करावी, अपुरे मनुष्यबळ असल्यास अतिरिक्त कर्मचारी व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची सुलभपणे नोंद करता यावी यासाठी आवश्यक पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दुर्गम व ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने नेटवर्कअभावी नोंदणी करता न येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन ई-पिक नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून विशेष शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी करून द्यावी. ई-पिक नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी शासनाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रशासकीय निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी राजाराम सावंत यांनी केली आहे.
फोटो:-
राजाराम सावंत.
