वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाला रत्नमोल निकम यांचा इशारा; प्रभाग ९ व १० मधील रहिवाशांचा संताप..
⚡वैभववाडी ता.२८-: वाभवे वैभववाडी नगरपंचायती हद्दीतील वार्ड क्रमांक ९ आणि १० मधील खुल्या (उघड्या) वहिवाट गटारावर तात्काळ काँक्रीट स्लॅब/झाकणे बसवा अन्यथा सोमवार, दिनांक ०५/१०/२०२६ रोजीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रत्नमोल निकम यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधील समस्त रहिवासी आपणास अतिशय गंभीर व तातडीच्या समस्येबाबत खालीलप्रमाणे निवेदन सादर करत आहोत:
प्रभाग क्र. ९ व १० मधील जुनी वहिवाट खोदून नगरपंचायतीमार्फत ओपन (उघड्या) गटाराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम सार्वजनिक सोयीऐवजी स्थानिक रहिवाशांसाठी अतिशय धोकादायक ठरत असून ‘हा विकास जनतेच्या की काँट्रॅक्टरचा?’ असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सदर गटार पूर्णतः उघडे असल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी, स्वच्छता पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात गंभीर व जीवघेणी बाब म्हणजे, रात्री-अपरात्री मोकाट जनावरे, गुरे-वासरे आणि कुत्र्याची पिल्ले या उघड्या गटारात पडून अडकतात. रात्रीच्या वेळी कुत्र्याची पिल्ले गटारात पडून मोठ्याने ओरडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मध्यरात्री १ ते २ वाजता उठून गटारात उतरून त्यांना बाहेर काढावे लागत आहे. यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून परिसरातील लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक अंधारात गटारात पडून गंभीर दुखापत वा जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कंत्राटदाराने गटाराचे काम पूर्ण करताना त्यावर योग्य ते सिमेंटचे स्लॅब किंवा मजबूत दापे टाकणे कायदेशीर व नैतिकदृष्ट्या बंधनकारक असतानाही प्रशासनाने व कंत्राटदाराने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
सदर गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन पुढील आठ दिवसांच्या आत प्रभाग क्र. ९ व १० मधील उघड्या गटारावर योग्य काँक्रीट स्लॅब/झाकणे बसवून मार्ग सुरक्षित करण्यात यावा.प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास, मी स्वतः श्री. रत्नमोल बारक्या निकम आणि प्रभागातील सर्व ग्रामस्थ मिळून सोमवार, दिनांक ०५/१०/२०२६ रोजीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर रीतसर कायदेशीर मार्गाने उपोषणास बसणार आहोत. तसेच याविषयी कायदेशीर पत्रकार परिषद घेऊन हा प्रश्न संपूर्ण जनतेसमोर मांडला जाईल असा इशारा रत्नमोल निकम यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.असे निवेदन न प चे मुख्य अधिकारी, तहसीलदार वैभववाडी व पोलीस निरीक्षक वैभववाडी यांना देण्यात आलेले आहे.

