Headlines

पर्यटननगरी मालवणला ऐन गणेशोत्सवात सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि जलक्रीडाना दमदार सुरुवात…

⚡मालवण ता.२७-:
गणेशोत्सव पर्यटननगरी असलेल्या मालवण मधील नव्या पर्यटन हंगामास अधिकृतरित्या १ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असली तरी सध्या गणेश चतुर्थीनंतर खऱ्या अर्थाने पर्यटनाला गती मिळत आहे. सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा तसेच स्कुबा डायविंग आणि वॉटरस्पोर्ट्स सुरु झाले असून पर्यटक किल्ला दर्शनाबरोबर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटत आहेत.

मालवण मधील सागरी पर्यटनाचा हंगाम हा शासकीय नियमानुसार १ सप्टेंबर ते २५ मे असा असतो. गत हंगाम २५ मे ला संपल्यावर पावसाळी कालावधीसाठी पर्यटन बंद राहून १ सप्टेंबर पासून सागरी पर्यटन सुरु झाले आहे. मात्र, पाऊस आणि समुद्राची खवळलेली स्थिती लक्षात घेता हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने किल्ला होडी सेवा आणि वॉटरस्पोर्ट्स सुरु झाले आहेत. गेले काही दिवस गणेशोत्सवाची धामधूम असल्याने पर्यटकांचा ओघ कमी होता. मात्र सध्या गणेशोत्सव समाप्तीनंतर हळूहळू पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. सध्या येणारे पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाला पसंती देत आहेत. तसेच स्कुबा डायविंग व इतर विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स सुरु झाल्याने पर्यटक त्यांचाही आनंद लुटत आहेत. पावसाळ्यात हवामान बदलते राहत असल्याने हवामानाचा अंदाज घेत व बंदर विभागाच्या सूचनांचे पालन करत व्यावसायिकांकडून पर्यटकांची योग्य ती काळजी घेत सागरी पर्यटन सुरु आहे.

पावसाळी बंदी कालावधीनंतर पर्यटन व्यावसाय हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येत असून पर्यटन व्यावसायिक देखील नव्या जोमाने कार्यरत झाले आहेत. गत हंगामात मालवणला लाखो पर्यटकांनी भेट दिली होती. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याला सुमारे ६ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे नव्या हंगामातही मोठ्या संख्येने पर्यटक येतील व पर्यटन व्यवसाय अधिक बहरेल, अशी आशा व्यवसायिकांमधून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page