सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ‘एसआयआर’वर गंभीर आरोप..

⚡ओरोस, ता. २८ -: विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये अनियमितता केली जात असल्याचा आरोप करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने केली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना गेल्या काही वर्षांत आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या काही निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृतरीत्या आक्षेप नोंदविल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, फॉर्म क्रमांक सहामधील बदल तसेच मतदार यादीशी संबंधित आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भात हे आक्षेप असल्याचे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर एसआयआरच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असून, त्यामुळे मतदानाच्या घटनात्मक अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादीत सुमारे ४७ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबतही काँग्रेसने २०२४ मध्ये निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविला होता. या मतदारवाढीचा सत्ताधारी पक्षाला फायदा झाल्याचा आरोप पक्षाने केला होता.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. आता निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध निर्णयांबाबत नोंदविलेल्या आक्षेपांमुळे या मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने या प्रकरणात वेगळी भूमिका मांडली आहे. संबंधित नोंदी या निर्णयप्रक्रियेतील ‘सूचना आणि अभिप्राय’ असल्याचे आयोगाने म्हटले असून, गेल्या वर्षातील महत्त्वाचे निर्णय तिन्ही आयुक्तांच्या एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आयोगाने बैठकींचे अजेंडे आधी वितरित करणे, इतिवृत्त तयार करणे आणि आयटी प्रणालीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमणे यासह नऊ निर्णय जाहीर केले आहेत.
लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने केली आहे.
निवेदन देताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर, उपाध्यक्ष नागेश मौर्य, मेघनाद धुरी, अनिल डेंगवेकर, विजय प्रभू, वासुदेव नाईक, जिल्हा सरचिटणीस देवानंद लुडबे, प्रवीण वरुणकर, मधुकर लुडबे, सुभाष दळवी, बाळू मेस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राजेंद्र कदम, सुगंधा साटम, महेश अंधारी, प्रवीण आचरेकर, अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, अभय मालवणकर, जेम्स फर्नांडिस, अभय शिरसाठ, वैभव वेंगुर्लेकर, प्रीती बांदेकर, सच्चिदानंद बुगडे, सरदार ताजर, बाळा शिरोडकर, निलेश मालंडकर, महेश परब, बाबाजी पांचाळ, अहमद बोबडे, सोनल सावंत, दिलशाद बोबडे, अमृत राऊळ, तरबेज शेख, लक्ष्मण शिरोडकर, सुशील बांदेकर, प्रदीप चौगुले, उमेश मोंडकर, रेवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
