⚡मालवण ता.१६-:
नौदलातर्फे मालवणच्या समुद्रात करण्यात येत असलेल्या जल सर्व्हेसाठी मच्छिमारी बंद ठेवण्याची प्रशासनाने दिलेली सूचना केंद्र वा राज्य शासनाच्या कोणत्या आदेशाने देण्यात आली आहे ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित करत मच्छीमार सोसायट्यांवर दबाव आणून त्यांना “हम करो सो कायदा” अशी व्यवस्था करण्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि अशाप्रकारची मासेमारी बंदी खपवून घेणार नाही, असाही इशारा श्री. खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
दरम्यान, ऐन गणेश चतुर्थी हंगामात मासेमारी बंद केल्यामुळे मच्छीमार आणि मालवण बजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे शासनाने मच्छीमारांना मासेमारी बंदी कालावधीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणीही श्री. खोबरेकर यांनी केली आहे.
मालवणात किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर मध्ये नौसेना दिन साजरा होणार असून यासाठी मालवणमध्ये दाखल होणाऱ्या अनेक बोटींच्या सुरक्षिततेसाठी नौदलाकडून मालवणच्या समुद्रात सर्व्हे करण्यात येत आहे. या जल सर्व्हेसाठी १८ ते २१ पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषेदत हरी खोबरेकर बोलत होते.
यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, नरेश हुले, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे, अनंत पाटकर, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्ग मालवण येथे बांधल्याने आम्हाला त्याचा अभिमान असून नौसेना दिना दिनानिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच इतर मान्यवर मालवण आणि किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र केंद्र व राज्य शासनाचा कोणताही आदेश मासेमारी बंद ठेवण्याबाबत प्रशासनाकडे नसताना सर्व्हे साठी प्रशासनाकडून जबरदस्तीने मासेमारी बंद करण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला आहे. मासेमारी बंद ठेवून जल सर्व्हे करणे आवश्यक असेल तर तशाप्रकारे शासन आदेश मच्छीमार सोसायट्यांनाही दाखविणे आवश्यक आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.
समुद्रात होत असलेल्या या जल सर्व्हेमुळे मच्छीमारांच्या अनेक जाळ्यांचे नुकसान झाले आहे. याबद्दल शासनाने अगोदर त्यांना मदत मिळवून द्यावी. या मासेमारी बंदी मुळे मच्छिमारांचे व बाजारपेठेचे नुकसान होणार आहे. तसेच जल सर्व्हे होणार त्या कालवधीत मासेमारी बंद ठेवायची असेल तर सर्व मच्छीमारांना चार दिवसांच्या नुकसान भरपाईपसाठी तात्काळ सानुग्रह अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी श्री. खोबरेकर यांनी केली आहे. मासेमारी बंद ठेवण्याची आवश्यकता नसतानाही प्रशासनाकडून अशाप्रकारची कार्यवाही करण्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
