सागरी जल सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या कालावधी व क्षेत्रात मासेमारी बंदीचे आवाहन

⚡मालवण ता.१५-: भारतीय नौदलामार्फत मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवरील कवडा रॉक ते देवबाग मोबार पर्यंतच्या समुद्रात १० ते १५ वाव क्षेत्रात जल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या जल सर्वेक्षणासाठी सदर समुद्री क्षेत्रात दि.१५ ते १७ सप्टेंबर या काळात सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत तर दि. १८ ते २१ सप्टेंबर या काळात २४ तास मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे.

मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून मालवणच्या समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी मासेमारी बंद ठेवण्याबाबत मालवण येथील तहसील कार्यालयात आज तहसीलदारांच्या उपस्थितीत मत्स्य सहकारी संस्था अध्यक्ष व प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार मत्स्यव्यवसायिकांचे म्हणणे लक्षात घेत सागरी जल सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या काळात १० ते १५ वाव समुद्री क्षेत्रात मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नौदल अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना दिल्या.

मच्छिमार सोसायट्यानी या मासेमारी बंदी बाबत सर्व नौका मालकांना माहिती द्यावी व सदर दिवशी मासेमारी बंदीचे पालन करूनशासनास सहकार्य करावे, असे आवाहन परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page