मालवणात रिक्षा व्यावसायिकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला

⚡मालवण ता.१५-: मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षा चालक संजय कृष्णा कोळंबकर (वय- ४९) यांचा मृतदेह राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आज सकाळी दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण शहरातील बसस्थानकाच्या मागील बौद्धवाडी येथे राहणारे रिक्षा व्यावसायिक संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. त्यांना दारूचे व्यसन होते. यातच काल रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता खोलीतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांचा भाऊ संतोष कोळंबकर यांनी आत पाहिले असता संजय कोळंबकर हे दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतावस्थेत दिसून आले.

संतोष कोळंबकर यांनी या घटनेची माहिती मालवण पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत. संजय कोळंबकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, तीन भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे.

You cannot copy content of this page